मुंबई,
Dhangar reservation protest, राज्यातील मराठा आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर आता धनगर समाजाच्या आरक्षणाचा मुद्दाही चांगलाच पेटला असून, धनगर समाजाकडून एसटी (अनुसूचित जमाती) प्रवर्गात समाविष्ट करण्याची मागणी अधिक तीव्र झाली आहे. या मागणीसाठी राज्यभरात ठिकठिकाणी आंदोलन, निदर्शने, चक्काजाम आणि रास्ता रोको करण्यात येत असून सरकारवर दबाव वाढताना दिसत आहे.
राज्यातील विविध Dhangar reservation protest, भागांमध्ये सुरू असलेल्या आंदोलनांमुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. जळगाव, परभणी, सोलापूर, जालना, या जिल्ह्यांत धनगर समाजाने आक्रमक भूमिका घेत रस्त्यावर उतरत आंदोलन सुरू केले आहे.जळगाव जिल्ह्यातील रावेर येथे ओंकारेश्वर-बऱ्हाणपूर महामार्गावर धनगर समाजाच्या वतीने चक्काजाम करण्यात आला. आंदोलनकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी करत महामार्ग पूर्णपणे ठप्प केला. यामुळे वाहतुकीची कोंडी निर्माण झाली. याच पार्श्वभूमीवर रावेरचे आमदार अमोल जावळे यांच्या निवासस्थानासमोरही ढोल बजाव आंदोलन करण्यात आले. आमदारांना निवेदन देत धनगर समाजाच्या मागण्यांकडे लक्ष देण्याची विनंती करण्यात आली.
दरम्यान, परभणी जिल्ह्यातही आंदोलनाचे लोण पसरले असून, धनगर समाजाकडून परभणी-गंगाखेड मार्ग अडवून चक्काजाम आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात मोठ्या संख्येने समाजबांधव सहभागी झाले होते. रस्त्यांवर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्याने सामान्य नागरिकांची गैरसोय झाली.सोलापूर जिल्ह्यातील करमाळा येथे सकल धनगर समाजाच्या वतीने रस्ता रोको करण्यात आला. अहिल्यानगर ते टेंभुर्णी महामार्गावरील मौलाली माळ येथे ढोल वाजवत आंदोलनकर्त्यांनी रस्ता अडवला. "आरक्षण आमच्या हक्काचे, नाही कुणाच्या बापाचे", "येळकोट येळकोट जय मल्हार" अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला. यावेळी जालन्यात सुरू असलेल्या दीपक बोराडे यांच्या अमरण उपोषणाला पाठींबा देण्यात आला.
जालना जिल्ह्यातही आंदोलन तीव्र झाले असून, आकाशवाणी चौकात राष्ट्रीय महामार्गावर मानवी साखळी करून रास्ता रोको करण्यात आला. मुंबई-नागपूर महामार्ग तब्बल पाऊण तास रोखण्यात आला. यावेळी महिलांचाही मोठ्या प्रमाणात सहभाग दिसून आला.
मागणी प्रलंबित
धनगर समाजाच्या Dhangar reservation protest, म्हणण्यानुसार, अनेक वर्षांपासून समाजाला एसटी प्रवर्गात समाविष्ट करण्याची मागणी प्रलंबित आहे. शासनाने वेळोवेळी आश्वासने दिली मात्र अद्याप कोणतीही ठोस कृती झालेली नाही. दीपक बोराडे यांनी सुरू केलेल्या उपोषणाला राज्यभरातून पाठिंबा मिळत असून, त्याला आता जनआंदोलनाचे स्वरूप प्राप्त होत आहे.राज्यातील वाढती आंदोलनं आणि चिघळलेली परिस्थिती लक्षात घेता राज्य सरकारवर दबाव वाढत असून, आगामी काळात यावर काय भूमिका घेतली जाते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. दरम्यान, काही ठिकाणी वाहतूक विस्कळीत झाल्याने पोलीस प्रशासन सतर्क झाले आहे आणि शांतता राखण्याचे आवाहन करण्यात आले आहे.