वर्धा,
voter-registration-program : नागपूर विभाग पदवीधर मतदार संघासाठी मतदार नोंदणी पुनरिक्षण कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. जिल्ह्यातील जास्तीत जास्त पदवीधर उमेदवारांनी मतदार म्हणून नोंदणी करण्याचे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.
३० सप्टेंबर रोजी मतदार नोंदणीची जाहीर सूचना प्रसिद्ध करण्यात आली आहे. त्यानुसार पदविधरांना नाव मतदार यादीत नोंदविता येणार आहे. प्रकरणपरत्वे नमुना १८ किंवा १९ द्वारे दावे व हरकती असल्यास ६ नोव्हेंबरपर्यंत स्वीकारण्यात येतील. प्रारुप मतदार यादीची प्रसिद्धी २५ नोव्हेंबर रोजी करण्यात येईल. मतदार यादीवर दावे व हरकती असल्यास २५ नोव्हेंबर ते १० डिसेंबर या दरम्यान स्वीकारण्यात येणार आहे. २५ डिसेंबर रोजी दावे व हरकती निकाली काढून ३० डिसेंबर रोजी अंतीम मतदार यादी प्रसिद्ध केल्या जाईल.
जिल्ह्यामध्ये सन २०२० मध्ये २१ हजार ८७९ पदवीधर मतदार होते. मूळ मतदार केंद्र २९ व सहाय्यक मतदान केंद्र ६ असे ३५ मतदान केंद्रावर निवडणूक पार पडलेली होती. पदवीधर मतदार संघाकरिता विभागीय आयुत मतदार नोंदणी अधिकारी आहे. जिल्ह्याकरिता जिल्हाधिकारी सहाय्यक मतदार नोंदणी अधिकारी म्हणून कामकाज पाहत आहे. मतदार नोंदणी अर्ज नमुना १८ स्विकारण्याकरिता उपविभागीय अधिकारी, तहसिलदार, मुख्याधिकारी, नायब तहसिलदार यांची केंद्रनिहाय पदनिर्देशित अधिकारी म्हणून नियुती करण्यात आली आहे.
नमुना १८ चा दावा, अर्ज उपविभागीय कार्यालय, तहसिल कार्यालय व जिल्ह्यातील १८ मतदान केंद्रावर पदनिर्देशित अधिकारी यांच्याकडे करता येईल. नव्याने मतदारयादी तयार करण्यात येत असल्याने आधी यादीत नाव असले तरी नव्याने अर्ज करणे आवश्यक आहे. मतदार टपालाद्वारे मतदार नोंदणीचा नमुना १८ आवश्यक साक्षांकित कागदपत्रासह सादर करू शकतात. अर्जासोबत विद्यापीठाने निर्गमित केलेली पदवी, सरकारी दप्तरी पदवी बाबतची नोंद, विद्यापीठाने पदवीधारण केल्याबाबत निर्गमित केलेले नोंदणी कार्ड, पदवीच्या अंतिम वर्षात उत्तीर्ण केलेली गुणपत्रिका जोडणे आवश्यक आहे. पदवीधर मतदार संघाकरिता जिल्ह्यातील सर्व पात्र पदविधरांनी पदनिर्देशित अधिकारी, सहायक मतदार नोंदणी अधिकारी यांच्या कार्यालयात नमूना-१८ अर्ज आवश्यक पुरावे व प्रमाणपत्रांसह दाखल करून मतदार यादीसाठी नावे नोंदवावी, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा सहाय्यक मतदार नोंदणी अधिकारी यांनी केले आहे.