आरोग्य आणि वनौषधी प्रकल्पाला नवी दिशा : सुनीलजी देशपांडे

(‘रोल’ संस्थेच्या अतिथीगृहाचे चिंचगुंडी येथे लोकार्पण)

    दिनांक :01-Oct-2025
Total Views |
आलापल्ली,
Sunilji Deshpande : अहेरी येथील दि रिसर्च ऑर्गनायझेशन फॉर लिव्हिंग एन्हान्समेंट (रोल) या संस्थेच्या माध्यमातून अहेरी लगत असलेल्या चिंचगुंडी येथे साकारण्यात आलेल्या अतिथी गृहाचे (गेस्ट हाऊस) नुकतेच उद्घाटन करण्यात आले. त्यामुळे ‘रोल’ संस्थेच्या आरोग्य आणि वनौषधी प्रकल्पाला गती मिळणार असल्याचे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे अखिल भारतीय सह सहसंपर्क प्रमुख सुनीलजी देशपांडे यांनी म्हटले.
 
 

jikj 
 
 
 
या अतिथीगृहाचे उद्घाटन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे अखिल भारतीय सहसंपर्क प्रमुख सुनीलजी देशपांडे यांच्या हस्ते फीत कापून आणि भारत मातेच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण व दीप प्रज्वलन करून करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी व्यासपीठावर ‘रोल’ संस्थेचे अध्यक्ष रमेश भाई पटेल, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे जिल्हा संघचालक सुरेश गड्डमवार, अप्पर जिल्हाधिकारी संजय आसवले, आमदार डॉ. मिलिंद नरोटे, हर्षवर्धनबाबा आत्राम यांची प्रमुख उपस्थिती होती.
 
 
पुढे बोलताना त्यांनी गडचिरोली जिल्ह्यात असलेल्या वनौषधींच्या प्रचंड साठ्याबद्दल माहिती देण्यात आली. आदिवासी समाज बांधवांकडून औषधी वनस्पतींच्या उपयोगाची माहिती मिळवण्यात आली असून, बांधवांकडून तब्बल 150 वनस्पतींची माहिती संकलित करण्यात आली आहे. सध्या ‘रोल’ च्या या प्रकल्पात 50 वनस्पती लावण्यात आल्या असून, भविष्यात आणखी वनस्पती लावण्याची योजना आहे, असे ते म्हणाले.
 
 
‘रोल’ प्रकल्पाच्या माध्यमातून आगामी काळात आरोग्यासाठी मोठे रुग्णालय उघडले जाईल, अशी माहिती यावेळी देण्यात आली. या प्रकल्पाची आरोग्यसेवा सिरोंचा तालुक्यात लोककल्याणकारी पाऊल उचलणार असल्याचेही सांगण्यात आले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अहेरी भागातील पंचक्रोशीतील नागरिक तसेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे पदाधिकारी व स्वयंसेवक मोठ्या संख्येने उपस्थित होते. संचालन संस्थेचे प्रदीप देशमुख यांनी तर आभार हेमंत राठी यांनी मानले.