उत्तर प्रदेश,
Irfan Solanki उत्तर प्रदेशातील कानपूर जिल्ह्यातील सीसामऊ विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार आणि समाजवादी पक्षाचे नेते इरफान सोलंकी तब्बल 33 महिन्यांनंतर मंगळवारी सायंकाळी तुरुंगातून मुक्त झाले. त्यांच्या सुटकेनंतर समाजमाध्यमांवर पोस्ट्स आणि व्हिडीओंचा अक्षरशः पूर आला असून, सोलंकी समर्थकांनी जल्लोषात त्यांचे स्वागत केले.
इरफान सोलंकी यांनी स्वतःही सोशल मीडियावर दोन फोटो शेअर केले आहेत. एका फोटोच्या कॅप्शनमध्ये त्यांनी लिहिले आहे – "स्वागत नहीं करोगे हमारा..." तर दुसऱ्या फोटोमध्ये ते पत्नी नसीम सोलंकीसोबत दिसत आहेत. या फोटोंमुळे सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर प्रतिक्रिया उमटत आहेत.कानपूरमध्ये इरफान सोलंकींच्या आगमनावेळी त्यांच्या समर्थकांनी गर्दी केली होती. एका व्हिडीओमध्ये त्यांच्या स्वागतासाठी लोकांचा मोठा जमाव, घोषणाबाजी आणि जल्लोष दिसून येतो. मंगळवारी सकाळी सुमारे 10 वाजता महाराजगंज कारागृहात अधिकृत आदेश पोहोचल्यावर सुटकेची प्रक्रिया सुरू करण्यात आली होती.
सायंकाळी 6:15 वाजता कारागृहाचे दरवाजे उघडले गेले, त्यावेळी त्यांच्या पत्नी नसीम सोलंकी, मुले आणि सासू खुर्शीदा बेगम यांनी त्यांचे उबदार स्वागत केले. इरफान यांनी सर्वांना मिठीत घेतले आणि भावनिक क्षण पाहायला मिळाला. कारागृहाबाहेर त्यांच्या समर्थकांनी घोषणाबाजी करत जल्लोष साजरा केला.
तुरुंगातून बाहेर आल्यानंतर कार्यकर्त्यांना संबोधित करताना सोलंकी म्हणाले, “*हा न्यायाचा विजय आहे, मला माझ्या अल्लाहवर विश्वास होता, आहे आणि राहील.”इलाहाबाद उच्च न्यायालयाने चार दिवसांपूर्वी सोलंकींना गँगस्टर अॅक्टखाली दाखल असलेल्या एका प्रकरणात जामीन मंजूर केला होता. मूळतः त्यांची रिहाई दुसऱ्या दिवशी होणार होती, मात्र उच्च न्यायालयाच्या आदेशांचे कागदपत्र वेळेवर कारागृहात न पोहोचल्याने त्यात तीन दिवसांची विलंब झाला.इरफान सोलंकी 2 डिसेंबर 2022 पासून तुरुंगात होते. त्यांच्याविरुद्ध एकूण 10 प्रकरणे दाखल आहेत. त्यांच्या तुरुंगवासानंतर झालेल्या पोटनिवडणुकीत त्यांच्या पत्नी नसीम सोलंकी या सीसामऊ मतदारसंघातून आमदार म्हणून निवडून आल्या.इरफान सोलंकींच्या सुटकेनंतर समाजवादी पक्षाच्या वर्तुळात पुन्हा एकदा उत्साहाचे वातावरण आहे. आगामी राजकीय घडामोडींमध्ये त्यांच्या पुनरागमनाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.