वर्धा,
Panchayat Samiti Mahilaraj : जिल्ह्यातील आठही पंचायत समितीच्या सभापती पदासाठीचे आरक्षण आज बुधवार १ रोजी सोडत प्रक्रियेद्वारे निश्चित करण्यात आले. आठ पैकी चार ठिकाणी महिला अशी सोडत निघाल्याने या चार ठिकाणी आता सभापती म्हणून महिला नेतृत्व करणार आहेत. ही आरक्षण सोडत जिल्हाधिकारी वान्मथी सी. यांच्या अध्यक्षेत पार पडली. यावेळी अपर जिल्हाधिकारी नरेंद्र फुलझेले, उपजिल्हाधिकारी (सामान्य) श्रीपती मोरे यांची उपस्थिती होती.

न्यायालयाच्या निर्देशानंतर प्राप्त सूचनांना केंद्रस्थानी ठेवून जिल्हा प्रशासनाच्या वतीने जिल्हा परिषद व पंचायत समितींच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या कामांना गती दिली जात आहे. जिल्हा परिषदेचे गट तर पंचायत समितींच्या गणांची प्रारुप रचना तयार करून त्यावर आक्षेप मागविण्यात आले होते. प्राप्त आक्षेपांचा सुनावणी घेत सोझ-मोक्ष लावण्यात आला. तर अंतिम रचनाही आता जाहीर करण्यात आली आहे. तर सध्या मतदार यादी तयार करण्याचे काम युद्धपातळीवर केले जात आहे. याच पृष्ठभूमीवर आज समुद्रपूर, आष्टी, हिंगणघाट, कारंजा, देवळी, वर्धा, आर्वी तर सेलू या जिल्ह्यातील आठ पंचायत समितींच्या सभापती पदाच्या आरक्षणाची सोडत जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात पार पडली.
या आरक्षण सोडतीसाठीच्या सभेला विविध राजकीय पक्षाचे प्रतिनिधींची उपस्थिती होती. समुद्रपूर पंचायत समितीच्या सभापतिपदाचे आरक्षण अनुसूचित जाती महिला, आष्टी अनुसूचित जमाती, हिंगणघाट नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला, कारंजा नागरिकांचा मागास प्रवर्ग, देवळी सर्वसाधारण, वर्धा सर्वसाधारण, आर्वी सर्वसाधारण महिला तर सेलू पंचायत समितीच्या सभापतिपदाचे आरक्षण सोडत प्रक्रिया राबवून सर्वसाधारण महिला असे निश्चित करण्यात आले. समुद्रपूर : एससी (महिला), आष्टी : एसटी, हिंगणघाट : नामाप्र (महिला), कारंजा : नामाप्र, देवळी : सर्वसाधारण, वर्धा : सर्वसाधारण, आर्वी : सर्वसाधारण (महिला), सेलू : सर्वसाधारण (महिला) अशी सोडत निघाली आहे.