अहिल्यानगर,
Sai Baba trust यंदा सप्टेंबर महिन्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे राज्यभर पुरस्थितीने गंभीर वळण घेतले असून, मराठवाड्यासह अनेक जिल्ह्यांमध्ये शेतीचे आणि नागरी जीवनाचे मोठे नुकसान झाले आहे. या पार्श्वभूमीवर शिर्डीच्या साईबाबा संस्थानने सामाजिक बांधिलकी जपत पुरग्रस्तांसाठी मोठी मदत जाहीर केली आहे. मुख्यमंत्री सहायता निधीसाठी संस्थानकडून तब्बल ५ कोटी रुपयांची आर्थिक मदत जाहीर करण्यात आली असून, यामुळे राज्य सरकारला मदतीचा हात मिळाला आहे.
संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांनी याबाबत माहिती देताना सांगितले की, यापूर्वी साईबाबा संस्थानकडून १ कोटी रुपयांची तातडीची मदत जाहीर करण्यात आली होती. मात्र, राज्यातील आपत्तीची तीव्रता लक्षात घेता आणि पुरग्रस्त नागरिकांवरील संकटाची गांभीर्य पाहता, संस्थानच्या पदाधिकाऱ्यांनी एकत्रित निर्णय घेऊन मदतीची रक्कम वाढवण्याचा निर्णय घेतला. आता ती रक्कम ५ कोटी रुपयांपर्यंत वाढवण्यात आली आहे.
या निर्णयामागे साईबाबा संस्थानच्या अध्यक्षा तथा अहिल्यानगरच्या जिल्हा प्रधान न्यायाधीश श्रीमती अंजू शेंडे (सोनटक्के), संस्थान समितीचे सदस्य आणि जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया, तसेच मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांचा सक्रिय सहभाग राहिला. मंगळवारी या वाढीव मदतीचा प्रस्ताव उच्च न्यायालयाच्या मंजुरीसाठी पाठवण्यात आला असून, मंजुरीनंतर मदतीचा निधी मुख्यमंत्री सहायता निधीत वर्ग केला जाणार आहे.राज्यस्तरावर आर्थिक मदत देण्यासोबतच, स्थानिक पातळीवरही साईबाबा संस्थानने माणुसकीचा धर्म जपत पुरग्रस्तांना दिलासा देण्याचे काम हाती घेतले आहे. शिर्डी परिसरात झालेल्या मुसळधार पावसामुळे अनेक घरांमध्ये पाणी घुसले आणि अनेक कुटुंबे बेघर झाली आहेत. अशा संकटग्रस्त नागरिकांसाठी साईबाबा संस्थानने साई आश्रमात तात्पुरत्या निवाऱ्याची व्यवस्था केली असून, प्रभावित कुटुंबांना सुरक्षित निवास उपलब्ध करून देण्यात आला आहे.
याशिवाय,Sai Baba trust संस्थानच्या प्रसादालयात या नागरिकांसाठी भोजनाचीही मोफत व्यवस्था करण्यात आली आहे. मंदिर प्रशासनाच्या वतीने देण्यात आलेल्या माहितीनुसार, रोज शेकडो लोक साई आश्रमात निवास घेत असून, त्यांना सकस आणि गरम अन्नाची व्यवस्था करण्यात येत आहे.राज्यावर ओढावलेल्या नैसर्गिक संकटाच्या पार्श्वभूमीवर साईबाबा संस्थानने उचललेले हे पाऊल सामाजिक बांधिलकीचा आदर्श उदाहरण ठरत असून, अनेकांनी संस्थानच्या या उपक्रमाचे कौतुक केले आहे. संकटाच्या काळात मानवतेच्या भावनेने केलेली ही मदत गरजू नागरिकांसाठी मोठा आधार ठरू शकते, अशी प्रतिक्रिया स्थानिक नागरिकांकडून व्यक्त होत आहे.