चंद्रपूर,
Pratibha Dhanorkar : तीन महिन्यांच्या पावसाळी विश्रांतीनंतर बुधवार, 1 ऑक्टोबरला ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाचे प्रवेशद्वार पर्यटकांसाठी उघडले. मात्र, या वेळी ताडोबा प्रशासनाच्या जिप्सी सफारी शुल्कवाढीच्या निर्णयाविरोधात काँग्रेसने आंदोलन छेडले. खासदार प्रतिभा धानोरकर यांच्या नेतृत्वाखाली मोहर्ली प्रवेशद्वारासह इतर पाच प्रवेशद्वारावर आंदोलन करण्यात आले.
वनविभागाने कोअर झोनमध्ये शनिवार आणि रविवारसाठी जिप्सी सफारीचे शुल्क वाढवून ते 12 हाजर 800 रुपये केले आहे. या दरवाढीविरोधात खा. धानोरकर यांनी भूमिका घेतली. जिल्ह्यात आधीच मानव-वन्यजीव संघर्ष मोठ्या प्रमाणात असताना, स्थानिकांकडून अधिक शुल्क आकारणे पूर्णपणे अयोग्य आहे, असे सांगत आंदोलनादरम्यान सर्व वाहनांची वाहतूक थांबवून प्रशासनावर त्वरित शुल्कवाढ मागे घेण्याचा दबाव आणण्यात आला.
ताडोबा व्याघ्र प्रकल्पाचे उपसंचालक अनंत रेड्डी यांनी, स्थानिकांना आता सफारी शुल्का पोटी 5 हजार रुपये आकारण्यात येईल, असे आश्वासन दिले. गाईड शुल्क वाढवण्यास आक्षेप नसून, जिल्ह्यातील सर्वसामान्यांना ताडोबा सफारी परवडेल, हीच आपली प्रमुख भूमिका असल्याचे खा. धानोरकर यांनी स्पष्ट केले. या चर्चेत प्रशासनाने स्थानिकांसाठी आठवड्यातून एक दिवस सवलतीचा विचार केला जाईल आणि हा मुद्दा समितीसमोर ठेवला जाईल, असेही आश्वासन दिले गेले. त्याचबरोबर, स्थानिक चालकाच इन्शुरन्सचा मुद्दा देखील सकारात्मक पद्धतीने स्वीकारण्यात आल्याचे सांगण्यात आले.
प्रशासनाकडून ठोस आश्वासन मिळाल्यानंतर खा. धानोरकर यांनी तात्पुरते आंदोलन मागे घेत पर्यटकांचा ताडोबात जाण्याचा मार्ग मोकळा केला. मात्र, आठ दिवसात उपसंचालकांनी दिलेले आश्वासन पूर्ण केले नाही, तर पुढील काळात तिव्र आंदोलन करून जिप्सी प्रवेश पूर्णपणे रोखू, असा इशारा त्यांनी दिला.