समुद्रपूर,
tiger-attack : तालुक्यातील गिरड-खुर्सापार शिवारात वाघाने चांगलाच धुमाकूळ घातला आहे. यासह मोहगाव शिवारातील वाघ सुद्धा अधूनमधून जनावरांना ठार करीत आहे. खुर्सापार शिवारात वाघाने खुर्सापार येथे गावाशेजारी गोठ्यात शिरकाव करून रेड्याला ठार केले. सावरखेडा येथे वासरू ठार करून बैल जखमी झाला. तर मोहगाव जंगलात सुद्धा वाघाने गायीला ठार केले. या दोन्ही घटना आज बुधवार १ रोजी सकाळच्या सुमारास उघडकीस आल्या.
मोहगाव जंगल परिसरात गिरड येथील शेतकरी दिवाकर नारनवरे यांची गाय चरायला गेली होती. मात्र, रात्री घरी परत आली नसल्याने तिचा शोध घेतला असता मोहगाव जंगलात वाघाने ठार केल्याचे निदर्शनास आले. दुसरी घटना सावरखेडा येथील शेतकरी सुधीर वाट यांच्या वासराला वाघाने ठार केले. याच गावातील प्रेमराज थुटे यांच्या शेताजवळच्या गोठ्याबाहेर बांधलेल्या बैलावर हल्ला करून जखमी केले. दोन दिवसापूर्वी खुर्सापार येथील रामराव निखुरे यांच्या गोठ्यात शिरून रेड्याला ठार केले.
वाघाच्या वाढत्या हल्ल्यांमुळे शेतकरी व शेतमजुरामध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. घटनेची माहिती मिळताच वनपरिक्षेत्र अधिकारी निलेश गावंडे यांच्या मार्गदर्शनात वनविभागाच्या अधिकारी, कर्मचार्यांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला. तिन्ही ठिकाणी वाघाच्या हालचाली टिपण्यासाठी वनविभागाच्या वतीने ट्रॅप कॅमेरे बसवण्यात आले आहे. जनावरांवरील वाढते हल्ले लक्षात घेता शेतकरी, शेतमजूर व नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन वनपरिक्षेत्र अधिकारी निलेश गावंडे यांनी केले आहे.