सराफा व्यावसायिकांच्या समस्यांच्या दक्षता समिती स्थापना

*मुख्यमंत्री फडणवीस व गृह राज्यमंत्री डॉ. भोयर यांचा पुढाकार

    दिनांक :01-Oct-2025
Total Views |
वर्धा, 
wardha-news : सराफा व्यावसायिकांना अडअडचणी व समस्यांची सोडवणूक तसेच अनेक प्रकरणात पोलिसांकडून होणार्‍या कारवाई दरम्यान येणार्‍या समस्यांची सोडवणूक करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, गृह राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर यांच्या पुढाकरातून राज्य व जिल्हा स्तरावर दक्षता समिती स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या समितीमध्ये पोलिस अधिकार्‍यांसह सराफा व्यावसायिकांचा समावेश राहणार आहे.
 
 
k
 
 
 
सराफा व्यायसायिकांना व्यवसाय करताना अनेक अडचणी निर्माण होत होत्या. पोलिसांकडून कारवाईच्या नावावर सराफा व्यावसायिकांची गळचेपी करण्यात येत होती. पोलिस कारवाईच्या विरोधात अनेकदा सराफांनी आंदोलनाची भूमिका घेतली होती. तथपि, सराफा व्यावसायिक व पोलिसांमध्ये समन्वय असावा, यासाठी समिती स्थापन करण्याची मागणी होत होती. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व गृह राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर यांनी पुढाकार घेत सराफा व्यावसायिक व पोलिस यांच्यात समन्वय स्थापन करण्यासाठी राज्यस्तर, पोलिस आयुतालय व जिल्हा स्तरावर समिती स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
 
 
या समितीचे अध्यक्ष विशेष पोलिस महानिरीक्षक (कायदा व सुव्यवस्था), सदस्य म्हणून पोलिस महासंचालकांचे विधि सल्लागार, सदस्य सचिव म्हणून पोलिस अधीक्षक राज्य पोलिस नियंत्राण कक्ष, सदस्य म्हणून नितीन खंडेलवाल, शैलेश खराटे अकोला, राजेश रोकडे नागपूर, सुधाकर टांक, किरण अंदिलकर पुणे, महावीर गांधी, गिरीष देवरमनी सोलापूर, भरत ओसवाल कोल्हापूर, सुभाष वडाला, अजीत पेंडूरकर मुंबई, राजेंद्र दिंडोरकर नाशिक व अमोल ढोमणे वर्धा यांचा समावेश आहे.
 
 
सराफांना दसर्‍याची भेट : ढोमणे
 
 
सराफा व्यावसायिकांना अनेक वर्षांपासून पोलिस कार्रवाईला सामोरे जावे लागते. वर्धेत देखील अशा कारवाईमुळे सराफा व्यावसायिकाला जीव गमवावा लागला होता. पण आता दक्षता समिती स्थापना करण्याचा निर्णय झाल्यामुळे आमच्या अडीअडचणी व समस्यांची सोडवणूक होणार असून पोलिस कारवाई संदर्भात काही नियम व निकष तयार होईल. त्यामुळे पोलिस व सराफा व्यावसायिक यांच्यात समन्वय वाढेल व दोघांना त्रास होणार नाही. मुख्यमंत्री फडणवीस व वर्धेचे पालकमंत्री तथा गृह राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर यांनी दसर्‍याच्या पर्वावर समाजाला मोठी भेट दिली असल्याची प्रतिक्रिया राज्य दक्षता समिती सदस्य अमोल ढोमणे यांनी दिली.