नागपूर,
Mukesh Saikia बांबू हा पर्यावरण पूरक असून याबद्दल युवकांमध्ये विशेष रुची निर्माण करण्यासाठी शालेय स्तरापासून बांबू हस्तकला आणि बांबूशी संबंधित उत्पादन निर्मितीवर अभ्यासक्रम समाविष्ट केले गेले तर आगामी पिढ्यांना त्याचा लाभ होईल असे मत बांबू हस्तशिल्प कलाकार मुकेश साईकिया यांनी व्यक्त केले. भारत सरकारच्या सांस्कृतिक मंत्रालयाच्या मार्गदर्शनात पश्चिम क्षेत्र सांस्कृतिक केंद्र, उदयपूर आणि दक्षिण मध्य क्षेत्र सांस्कृतिक केंद्र, नागपूर यांच्या संयुक्त विद्यमाने नॉर्थ-ईस्ट फेस्टिवल "ऑक्टेव्ह" चे भव्य आयोजन दिनांक ९ ते १२ ऑक्टोबर दरम्यान करण्यात आले आहे. या चार दिवसात दररोज सकाळी ११ ते सायंकाळी ५ पर्यंत निशुल्क बांबू कार्यशाळा आयोजिण्यात आली आहे. कार्यक्रमाच्या उदघाटनाप्रसंगी ते बोलत होते.
बांबू शिल्प आणि उत्पादन निर्मित्तीमध्ये प्रचंड क्षमता असून यांचे चांगले मार्केटिंग व्हावे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. यावेळी अनेक कलाकार तसेच, सामान्य लोकांनी देखील या कार्यशाळेत सहभागी होऊन बांबूचे विविध उत्पादन आणि हस्तशिल्प निर्मितीतले बारकावे जाणून घेतले.
साईकिया यांनी दिली बांबूबद्दल विशेष माहिती
आसाम Mukesh Saikia गुवाहाटी मधून आलेले मुकेश साईकिया यांनी उपस्थित सर्वांना गृह शोभेच्या वस्तू, बांबूपासून तयार होणारे क्लिप, मग, फ्लॉवर पॉट यासह विविध वस्तूंच्या निर्मितीसाठी लागणाऱ्या कौशल्याबद्दल माहिती दिली. तसेच बांबूचे विविध प्रकार, आसाममधील बांबू, त्यातून तयार होऊ शकणाऱ्या विविध वस्तू याबद्दल देखील त्यांनी माहिती दिली. याशिवाय सरकारच्या विविध योजना जसे की पीएम विश्वकर्मा आणि राज्याच्या योजना देखील बांबू कारागिरांना अत्यंत फायदेशीर ठरत असल्याचे देखील त्यांनी सांगितले.