अरे... तुला कुणी परवाना दिलाय वाटेल ते बोलायचा?

छगन भुजबळ यांची जरांगेवर टीका

    दिनांक :10-Oct-2025
Total Views |
मुंबई,
chhagan bhujbal राज्य सरकारने २ सप्टेंबर २०२५ रोजी काढलेल्या मराठा-कुणबी संबंधीत शासन निर्णयाच्या (जीआर) विरोधात ओबीसी नेते पुन्हा आक्रमक झाले आहेत. या पार्श्वभूमीवर आज झालेल्या पत्रकार परिषदेत राज्याचे मंत्री आणि ज्येष्ठ ओबीसी नेते छगन भुजबळ यांनी स्पष्ट शब्दांत मनोज जरांगे पाटील यांच्यावर सडकून टीका करत, आपली भूमिका स्पष्ट केली.
 
 

chhagan bhujbal criticized maratha leader manoj jarange patil 
भुजबळांनी जीआरवर chhagan bhujbal  टीका करत म्हटले की, “जर तुम्ही म्हणता की तुम्ही कुणबी नाही, मग इतके लोक कुठून घुसवता? हा प्रश्न फक्त ओबीसींच्या आरक्षणाचा नाही, तर न्यायाचा आहे.” त्यांनी सांगितले की ओबीसी समाजातील ३०० हून अधिक जातींचे प्रतिनिधित्व करणारे नेते या निर्णयाविरोधात आपापल्या स्तरावर लढा देत आहेत. ओबीसी समाजात एकवाक्यता नसल्याचा आरोप फेटाळून लावत त्यांनी म्हटले की, “प्रत्येक समाजातील संघटना व व्यक्ती अन्यायाविरोधात उभी राहते आहे, हेच एकवाक्यतेचे लक्षण आहे.”या पत्रकार परिषदेत छगन भुजबळांनी मनोज जरांगे यांच्यावरही जोरदार शब्दांत टीका केली. “मनोज जरांगे हे ‘सो कॉल्ड’ मराठा नेते आहेत. त्यांच्या असंस्कृत भाषेचा आणि वर्तनाचा आम्ही निषेध करतो. त्यांनी माझ्यावर, मुख्यमंत्र्यांवर, उपमुख्यमंत्र्यांवर आणि अगदी राहुल गांधींपर्यंत अश्लाघ्य विधाने केली आहेत. अरे कोण तू? तुला कुणी परवाना दिलाय वाटेल ते बोलायचा?” असा संतप्त सवाल त्यांनी उपस्थित केला.
 
 
 
भुजबळांनी स्पष्ट केले की त्यांचा विरोध मराठा समाजाला नसून, चुकीच्या पद्धतीने ओबीसी आरक्षणात हस्तक्षेप करण्याच्या प्रयत्नांना आहे. “जरांगेंनी अनेक वेळा माझ्यावरही वैयक्तिक आरोप केले, मला परदेशात पाठवण्याची भाषा केली. त्यांच्या पाठीमागे मराठा समाज चालतो, हे पाहून खंत वाटते,” असेही त्यांनी म्हटले.
 
 
भुजबळांनी आपल्या भाषणात राज्याच्या सामाजिक समरसतेवरही भाष्य केले. “यशवंतराव चव्हाण यांना विचारले गेले होते की हे राज्य मराठ्यांचं होणार की मराठीचं? त्यांनी ठामपणे म्हटले होते की हे राज्य मराठ्यांचं नव्हे, तर मराठी भाषिकांचं होणार. आज मात्र हे सारे विसरले जात आहे,” असे ते म्हणाले.राज्यातील मराठा आरक्षणाच्या आंदोलनावरून वाढत चाललेले ओबीसी समाजाचे असंतोषाचे सुर ओळखून भुजबळांच्या नेतृत्वाखाली ओबीसी नेत्यांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. त्यामुळे पुढील काही दिवसांत राज्याच्या राजकारणात आणि सामाजिक समीकरणात मोठे उलथापालथी होण्याची शक्यता नाकारता येत नाही.