आरोग्य सुविधांच्या उन्नतीसाठी आमदार डॉ. नरोटे यांचा पाठपुरावा

    दिनांक :10-Oct-2025
Total Views |
गडचिरोली, 10 ऑक्टोबर
Dr. Milind Narote जिल्ह्यातील आरोग्य सेवा अधिक परिणामकारक, उपलब्ध आणि जनतेच्या गरजांनुसार व्हाव्यात, या उद्देशाने आमदार डॉ. मिलिंद नरोटे यांनी राज्याचे सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याणमंत्री प्रकाश आबिटकर यांची मुंबई येथे भेट घेतली. या भेटीदरम्यान आमदार नरोटे यांनी जिल्ह्यातील आरोग्य सुविधांच्या उन्नतीसाठी आणि वैद्यकीय व्यवस्थेतील विद्यमान अडचणी दूर करण्यासाठी काही महत्त्वपूर्ण मागण्या सादर केल्या.
 

Dr. Milind Narote  
गडचिरोलीसारख्या दुर्गम, आदिवासी व भौगोलिकदृष्ट्या कठीण भागात नागरिकांना आरोग्य सेवेपर्यंत पोहोचण्यात अनेक अडथळे निर्माण होतात. या पार्श्‍वभूमीवर आमदार नरोटे यांनी शासनाच्या माध्यमातून आरोग्य सुविधांची उपलब्धता आणि गुणवत्ता सुधारावी, या उद्देशाने जिल्ह्यासाठी ठोस मागण्या मांडल्या. त्यांनी स्पष्ट केले की, गडचिरोली जिल्हा सामान्य तसेच महिला व बाल रुग्णालय या दोन्ही संस्था शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात विलीन न करता स्वतंत्र ठेवणे आवश्यक आहे. दोन्ही रुग्णालये जिल्ह्यातील सर्वसामान्य रुग्णांसाठी अत्यंत महत्त्वाची असून, त्यांची स्वतंत्र ओळख आणि सेवा टिकविणे गरजेचे आहे.
याशिवाय त्यांनी धानोरा तालुक्यातील पेंढरी येथे ग्रामीण रुग्णालय स्थानानुसार उभारण्याची तसेच चामोर्शी तालुक्यातील आष्टी येथे ट्रॉमा केअर युनिट सुरू करण्याची मागणी केली. त्यांनी सांगितले की, या भागांतील रुग्णांना अपघात किंवा गंभीर आजाराच्या प्रसंगी वेळेवर उपचार मिळत नाहीत. त्यामुळे अशा सुविधा उभारणे अत्यावश्यक आहे. जिल्ह्याच्या विस्तीर्ण आणि डोंगराळ भूभागाचा विचार करता 108 रुग्णवाहिका सेवा केवळ लोकसंख्येच्या आधारे नव्हे तर भौगोलिक परिस्थितीनुसार उपलब्ध करून द्याव्यात, अशी सूचना त्यांनी केली. सध्या अनेक गावांमध्ये रुग्णवाहिका पोहोचायला दीर्घ वेळ लागतो. त्यामुळे आपत्कालीन परिस्थितीत नागरिकांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागते. जिल्ह्यात क्षयरोगाचे प्रमाण वाढत असल्याने स्वतंत्र क्षयरोग रुग्णालय स्थापन करण्याची मागणीही त्यांनी केली. गडचिरोली महिला रुग्णालयातील वाढीव पदांना शासनमान्यता देऊन तातडीने भरती प्रक्रिया सुरू करावी, असेही त्यांनी सांगितले. याशिवाय जिल्ह्यातील रिक्त वैद्यकीय अधिकारी पदे त्वरित भरण्याची मागणी केली.
सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांनी आमदार डॉ. नरोटे यांच्या सर्व मागण्यांकडे सकारात्मक दृष्टीने पाहत त्वरित कारवाईसाठी संबंधित अधिकार्‍यांना सूचना देण्याचे आश्‍वासन दिले. या बैठकीला आरोग्य विभागाचे वरिष्ठ अधिकारी, आमदार नरोटे यांचे सहकारी व स्थानिक कार्यकर्ते उपस्थित होते.