गोंदिया,
paddy गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे आणि अतिवृष्टीमुळे गोंदिया तालुक्यातील धानासह इतर पिकांची नासाडी झाली असून शेतकर्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. शेतकर्यांच्या या समस्येला गांभीर्याने घेत आ. विनोद अग्रवाल यांनी शुक्रवार, १० ऑक्टोबर रोजी स्थानिक तहसील कार्यालयात आपत्कालीन बैठक घेत अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचे तात्काळ पंचनामे करून शासनाकडे पाठविण्याचे निर्देश संबंधित अधिकार्यांना दिले.
जिल्ह्यात विशेषतः तालुक्यात सततच्या पावसामुळे कापणीवर आलेल्या धान पिकांसोबतच अतिवृष्टीमुळे घरांचेही मोठ्याप्रमाणात नुकसान झाले आहे. त्यामुळे सणासुदीच्या काळात शेतकर्यांसह सर्वसामान्य नागरिक आर्थिक अडचणीत सापडले आहे. विशेष म्हणजे, गोंदिया तालुक्यात हलक्या धानाची लागवड जास्त प्रमाणात होते. सध्या अनेक शेतकर्यांचे धान कापून ठेवलेले असून अतिवृष्टीमुळे ते नष्ट झाले आहे. धानावर मावा व तुडतुडा रोगाचा प्रादुर्भाव झाला आहे. ही स्थिती संपूर्ण परिसरात सारखीच आहे. धान पिकांचे व घरांचे झालेले नुकसान पाहता अनेक शेतकर्यांनी आ. विनोद अग्रवाल यांना शेताची विद्यमान स्थिती सांगितली होती. यावर आ. अग्रवाल यांनी शुक्रवारी स्थानिक तहसील कार्यालयात आपात्कालीन बैठक घेत संबंधित अधिकार्यांना घर, गोठे व शेतीचे तातडीने पंचनामे करून शासनाकडे सादर करण्याचे निर्देश दिले. यावेळी बैठकीत उपविभागीय अधिकारी चंद्रभान खंडाईत, तहसीलदार शमशेर पठाण, अतिरिक्त तहसीलदार श्रीकांत कांबळे, गटविकास अधिकारी महेंद्र मडामे, कृषी अधिकारी नेहा आढव, नायब तहसीलदार सीमा पाटणे, छगन माने, राजू कटरे, लखन हरिणखेडे तसेच शेतकरी उपस्थित होते.