नवी दिल्ली,
Putin Apologize For Azerbaijan रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी गुरुवारी पहिल्यांदाच कबूल केले की, डिसेंबर २०२४ मध्ये झालेल्या अझरबैजानच्या विमान अपघातामागे रशियाच्या हवाई संरक्षण यंत्रणेत झालेला बिघाड कारणीभूत ठरला. विमान बाकूहून ग्रोझनीकडे जात होते आणि त्यात एकूण ६७ प्रवासी होते. या अपघातात ३८ जणांचा मृत्यू झाला. रशियाने सांगितले की, त्यांचे हवाई संरक्षण दल युक्रेनियन ड्रोन पाडण्यासाठी क्षेपणास्त्रे वापरत होते, परंतु त्या क्षेपणास्त्रांचा स्फोट विमानाजवळच झाला. यामुळे विमान पश्चिम कझाकस्तानमध्ये कोसळले. रशियन राष्ट्रपती पुतिन यांनी अझरबैजानचे अध्यक्ष इल्हम अलीयेव्ह यांच्याशी झालेल्या अधिकृत बैठकीत माफी मागितली आणि मृतांच्या कुटुंबियांना भरपाई देण्याचे आश्वासन दिले.
पुतिन म्हणाले की, "जर क्षेपणास्त्रे थेट विमानाला लागली असती, तर विमान लगेच कोसळले असते." त्यांनी पुढे स्पष्ट केले की, रशियन हवाई वाहतूक नियंत्रक (एटीसी) यांनी पायलटला मखाचकला येथे उतरण्याचा सल्ला दिला होता, परंतु पायलटने त्याऐवजी विमान त्यांच्या गृह विमानतळाकडे नेण्याचा प्रयत्न केला. या प्रक्रियेतच कझाकस्तानमध्ये अपघात झाला. या अपघातामुळे रशिया-अझरबैजान संबंध ताणले गेले होते. अझरबैजानने रशियावर तथ्ये लपवण्याचा आरोप केला होता आणि आपल्या नागरिकांच्या सुरक्षिततेवर लक्ष ठेवण्यास सुरुवात केली. अपघातानंतर रशियामध्ये राहणाऱ्या अझरबैजानी समुदायात चिंता आणि असंतोष पसरला होता.