वॉशिंग्टन,
America's blow to China अमेरिका आणि चीन यांच्यातील व्यापारयुद्ध पुन्हा पेटले आहे. चीनने अमेरिकन उद्योगांसाठी अत्यावश्यक असलेल्या दुर्मिळ खनिजांच्या निर्यातीवर बंदी घातल्यानंतर अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी चीनविरुद्ध कठोर भूमिका घेतली आहे. ट्रम्प यांनी चीनवर १०० टक्के अतिरिक्त कर लादण्याची घोषणा केली असून हे नवीन शुल्क १ नोव्हेंबर २०२५ पासून लागू होणार आहे. ट्रम्प यांनी शुक्रवारी जाहीर केलेल्या या निर्णयानुसार, चीनकडून येणाऱ्या सर्व वस्तूंवर आधीच असलेल्या शुल्काशिवाय १०० टक्के अतिरिक्त कर लावला जाईल. ट्रम्प यांनी इशारा दिला की जर चीनने आणखी कोणतीही आक्रमक कारवाई केली, तर हे कर १ नोव्हेंबरपूर्वीच लागू केले जातील. याशिवाय, अमेरिकेने चीनकडे निर्यात होणाऱ्या सर्व महत्त्वाच्या सॉफ्टवेअरवर बंदी घालण्याचाही निर्णय घेतला आहे.
अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प यांनी आपल्या ट्रुथ सोशल या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर चीनवर तीव्र टीका केली. त्यांनी म्हटले की, “चीन अत्यंत आक्रमक व्यापार धोरण राबवत आहे आणि अमेरिका त्याला ठोस उत्तर देईल.” तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, या नव्या कर युद्धामुळे जागतिक अर्थव्यवस्थेवर मोठा परिणाम होऊ शकतो. विशेषतः ग्राहक इलेक्ट्रॉनिक्स, संगणक तंत्रज्ञान आणि इलेक्ट्रिक वाहन क्षेत्रांना याचा मोठा फटका बसण्याची शक्यता आहे.
ट्रम्प यांनी सांगितले की, सध्या अमेरिकेचा विचार अनेक पर्यायांवर सुरू आहे, ज्यामध्ये चीनकडून येणाऱ्या उत्पादनांवरील शुल्कात आणखी वाढ करणे आणि अमेरिकेत चिनी गुंतवणुकीवर नियंत्रण ठेवणे यांचा समावेश आहे. त्यांनी स्पष्ट केले की, आपल्या आगामी आशियाई दौऱ्यात त्यांना चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग यांची भेट घेण्याची कोणतीही गरज वाटत नाही. अमेरिका आणि चीनमधील वाढता व्यापार तणाव जागतिक बाजारपेठेतील अस्थिरता वाढवू शकतो. या दोन्ही महासत्तांमधील आर्थिक संघर्ष आगामी काही महिन्यांत अधिक तीव्र होण्याची चिन्हे स्पष्ट दिसत आहेत.