पाकिस्तानात पोलिस प्रशिक्षण शाळेवर हल्ला; सहा दहशतवादी ठार

    दिनांक :11-Oct-2025
Total Views |
पेशावर,
Attack on police training school पाकिस्तानमध्ये दहशतवाद पुन्हा डोके वर काढत आहे. खैबर पख्तूनख्वा प्रांतातील डेरा इस्माईल खान येथील पोलिस प्रशिक्षण शाळेवर तहरीक-ए-पाकिस्तान या दहशतवादी संघटनेच्या दहशतवाद्यांनी आत्मघातकी हल्ल्याचा प्रयत्न केला. मात्र, पाकिस्तानी सुरक्षा दलांच्या तत्परतेमुळे हा हल्ला मोठा होण्यापासून रोखण्यात आला. या चकमकीत सहा दहशतवादी ठार झाले असून तीन पोलिसांचा मृत्यू झाला आहे.
 
 
Attack on police training school
 
दक्षिण वझिरीस्तान सीमेजवळ असलेल्या या प्रशिक्षण केंद्रावर सात ते आठ सशस्त्र दहशतवाद्यांनी अचानक हल्ला चढवला. एका आत्मघातकी हल्लेखोराने परिसरात प्रवेश करून स्वतःला उडवून दिले, ज्यामुळे परिसरात भीषण स्फोट झाला आणि नंतर दोन्ही बाजूंमध्ये जोरदार गोळीबार रंगला. सुरक्षा दलांनी दिलेल्या प्रत्युत्तरात सहा दहशतवादी ठार झाले, तर आणखी काहीजण जवळच्या परिसरात लपल्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. दहशतवाद्यांचा शोध घेण्यासाठी सुरक्षा दलाची मोहीम सुरू आहे. जिल्हा पोलिस अधिकारी सज्जाद अहमद सब्जदार यांच्या देखरेखीखाली ही कारवाई सुरू असून, ऐजाज शहीद पोलिस लाईन्समधून अतिरिक्त पोलिस दल तैनात करण्यात आले आहे.
 
 
 
घटनेनंतर पाकिस्तानी लष्कराच्या स्पेशल सर्व्हिसेस ग्रुप (एसएसजी) च्या तुकड्या घटनास्थळी दाखल झाल्या असून, त्यांनी बचाव आणि नियंत्रणाची जबाबदारी स्वीकारली आहे. प्रत्यक्षदर्शींनी सांगितले की, हल्ल्यादरम्यान परिसरात विमानांचे मोठे आवाज ऐकू येत होते. पाकिस्तानी पोलिसांच्या माहितीनुसार, बंदी घातलेल्या तहरीक-ए-तालिबान पाकिस्तान (टीटीपी) या संघटनेने हा हल्ला केला. त्यांच्या हल्ल्याचा उद्देश मोठा विध्वंस घडवून आणण्याचा होता, परंतु सुरक्षा दलांच्या तत्परतेमुळे त्यांच्या योजना फसल्या. दरम्यान, अलीकडच्या काही दिवसांत पाकिस्तानमध्ये टीटीपीच्या हल्ल्यांमध्ये वाढ झाली आहे. अफगाणिस्तानची राजधानी काबूलमध्ये झालेल्या स्फोटांनंतर पाकिस्तान आणि अफगाणिस्तानमधील संबंधांमध्ये तणाव वाढला आहे. त्यामुळे या घटनेला प्रादेशिक सुरक्षेच्या दृष्टीने गंभीर मानले जात आहे.