Cold in Delhi before Diwali देशभरात हवामानात मोठे बदल होताना दिसत आहेत. दिल्लीसह उत्तर भारतात हळूहळू थंडीची चाहूल लागली असून, दिवस उबदार आणि रात्री गारठ्याच्या होत आहेत. दिवाळीपूर्वीच थंडीची झुळूक जाणवू लागल्याने राजधानीत हिवाळ्याची सुरुवात झाल्याचे स्पष्ट संकेत दिसत आहेत. शुक्रवारी दिल्लीतील तापमान प्रथमच २० अंश सेल्सिअसच्या खाली नोंदवले गेले. हवामान खात्याच्या आकडेवारीनुसार, राष्ट्रीय राजधानीत किमान तापमान १८.८ अंश सेल्सिअस इतके होते. करवा चौथच्या दिवशी सकाळी आणि संध्याकाळी थंडीची जाणीव स्पष्टपणे होत होती. गेल्या वर्षी याच काळात म्हणजे १२ ऑक्टोबर २०२४ रोजी तापमान १८.६ अंश सेल्सिअसवर गेले होते, तर २०२३ मध्ये ते १८.३ अंशइतके होते. या तुलनेत यंदाही हिवाळ्याचा प्रारंभ जवळपास त्याच वेळी होत असल्याचे दिसते.
दरम्यान, देशाच्या पूर्व आणि दक्षिणेकडील भागांमध्ये अजूनही मान्सून सक्रिय आहे. पश्चिम बंगालमध्ये शुक्रवारी कोलकात्यात मुसळधार पाऊस झाला असून, हा पाऊस पुढील काही दिवस कायम राहण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. कोलकाता आणि दक्षिण बंगालमध्ये काही ठिकाणी ३० ते ४० किमी प्रतितास वेगाने वारे आणि गडगडाटी पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. ईशान्य भारतातील आसाम, मेघालय, नागालँड, मणिपूर, मिझोराम आणि त्रिपुरा तसेच दक्षिण भारतातील तामिळनाडू, अंतर्गत कर्नाटक आणि लक्षद्वीप येथेही हलका ते मध्यम पावसाचा अंदाज आहे.
१० ऑक्टोबरपर्यंत उत्तर प्रदेश, बिहार, मध्य प्रदेश, गुजरात आणि महाराष्ट्राच्या बहुतांश भागांतून मान्सून माघार घेतली आहे. पुढील तीन ते चार दिवसांत तो पश्चिम बंगाल, झारखंड, छत्तीसगड, ओडिशा, सिक्कीम आणि तेलंगणाच्या काही भागातूनही मागे हटेल, असा अंदाज वर्तवला जात आहे. उत्तर प्रदेशात ११ आणि १२ ऑक्टोबर रोजी स्वच्छ आणि कोरडे हवामान राहणार आहे. या काळात तापमानात किंचित वाढ होऊन दिवसाच्या वेळेत उष्णतेची तीव्रता जाणवू शकते. तथापि, १३ ते १५ ऑक्टोबर दरम्यान पश्चिम व पूर्व उत्तर प्रदेशात पावसाची शक्यता नसल्याचे हवामान विभागाने स्पष्ट केले आहे. एकूणच, उत्तर भारतात हिवाळ्याचे आगमन आणि पूर्व व दक्षिण भारतात सुरू असलेल्या मान्सूनमुळे देश दोन भिन्न हवामानिक टप्प्यांतून जात आहे. उत्तर भागात गारवा तर दक्षिणेत अद्याप पावसाचा जोर कायम आहे.