मुंबई,
Idli Kadhai दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील सुप्रसिद्ध अभिनेता धनुषने हिंदी पटांमध्येही आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. विशेषतः रांझणा चित्रपटानंतर त्याची हिंदी प्रेक्षकांमध्ये लोकप्रियता लक्षणीयरीत्या वाढली. ‘सर’, ‘कॅप्टन मिलर’, ‘रायन’ आणि ‘कुबेरा’ यांसारख्या चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर भरघोस कमाई करत त्याच्या करिअरला बळ दिले. मात्र सध्या प्रदर्शित झालेला इडली कढई हा चित्रपट मात्र अपेक्षित कामगिरी करण्यात अपयशी ठरत असल्याचं चित्र आहे.
धनुषच्या या नव्या चित्रपटाने सुरुवातीला चांगली ओपनिंग घेतली असली तरी, नकारात्मक समीक्षणं आणि प्रेक्षकांच्या कमकुवत प्रतिसादामुळे काही दिवसांतच त्याचा जोर ओसरल्याचे दिसून आले. इडली कढईचा एकूण बजेट सुमारे १०४ कोटी रुपयांचा असून, आतापर्यंत भारतात केवळ ४५.५० कोटी रुपयांची कमाई झाली आहे. परदेशांतूनही केवळ १० कोटींचा गल्ला जमा झाल्यामुळे एकूण वर्ल्डवाइड कलेक्शन ६३ कोटी रुपयांपर्यंत पोहोचले आहे. परिणामी, चित्रपट अजूनही आपला खर्चही भरून काढू शकलेला नाही.
या चित्रपटाला मिळालेल्या मर्यादित प्रतिसादामागे ऋषभ शेट्टीच्या कांतारा: चॅप्टर १या चित्रपटाची प्रभावी उपस्थिती देखील कारणीभूत ठरली आहे. दोन्ही चित्रपट एकाच काळात प्रदर्शित झाल्याने इडली कढईला पुरेशी स्क्रीन मिळवणं आणि प्रेक्षकांना आकर्षित करणं अवघड झालं. शिवाय, चित्रपटाचं कथानक आणि सादरीकरण यावर प्रेक्षकांनी नाराजी व्यक्त केल्याचं सोशल मीडियावर दिसून आलं.धनुषच्या मागील पाच चित्रपटांनी मात्र चांगली कमाई केली होती. २०२३ मध्ये आलेल्या सर पासून सुरू झालेल्या या यशाची मालिका कॅप्टन मिलर, रायन आणि कुबेराने पुढे चालू ठेवली. विशेषतः ‘कुबेरा’ने तर भारताबाहेरही चांगली कमाई करत अभिनेता म्हणून धनुषचा दर्जा अधिकच उंचावला.
आता प्रेक्षकांच्या अपेक्षा धनुषच्या आगामी चित्रपटांकडे लागून आहेत. सध्या तो तेरे इश्क में या हिंदी चित्रपटात झळकणार आहे. हा चित्रपट हिंदी प्रेक्षकांसाठी महत्त्वाचा मानला जातो. तसेच, D54 नावाचा आणखी एक प्रोजेक्टही तो करत आहे, जो त्याच्या कारकिर्दीतील ५४वा चित्रपट ठरेल. मात्र या चित्रपटाबाबत अद्याप अधिकृत माहिती समोर आलेली नाही.
इडली कढईच्या अपयशानंतर धनुषच्या यशस्वी ट्रॅक रेकॉर्डला थोडीशी ओढ बसली असली तरी, त्याच्या आगामी चित्रपटांमधून तो पुन्हा आपलं जादूई यश मिळवेल, अशी अपेक्षा त्याच्या चाहत्यांना आहे. आता हे पाहणं महत्त्वाचं ठरेल की धनुषची लोकप्रियता आणि अभिनय कौशल्य त्याला पुन्हा बॉक्स ऑफिसवर यश मिळवून देईल का.