टेनेसी,
Explosion at military factory in America अमेरिकेच्या टेनेसी राज्यात एका लष्करी स्फोटक उत्पादन कारखान्यात झालेल्या भीषण स्फोटात अनेकांच्या मृत्यूची भीती व्यक्त केली जात आहे. सुमारे १९ कामगार बेपत्ता असल्याचे स्थानिक प्रशासनाने सांगितले असून, बचावकार्य युद्धपातळीवर सुरू आहे. हा स्फोट नॅशव्हिलपासून सुमारे एक तासाच्या अंतरावर असलेल्या बक्सनॉर्ट येथील “अॅक्युरॅट एनर्जेटिक सिस्टम्स” या लष्करी स्फोटके, अंतराळ आणि विध्वंस उपकरणे तयार करणाऱ्या कंपनीच्या कारखान्यात झाला. रात्री उशिरा झालेल्या या स्फोटाने संपूर्ण परिसर हादरला. स्फोटाचा आवाज इतका प्रचंड होता की जवळपासच्या घरांच्या भिंती कंप पावत असल्याची भावना रहिवाशांनी व्यक्त केली.
स्थानिक अधिकारी ख्रिस डेव्हिस यांनी सांगितले की, स्फोटानंतर कारखान्यातील कामगार बेपत्ता झाले असून त्यांच्या कुटुंबीयांनी घटनास्थळी गर्दी केली आहे. परिसरात जळत्या रसायनांचा तीव्र धूर पसरल्याने अधिकाऱ्यांनी नागरिकांना घराबाहेर न पडण्याचे आणि सुरक्षित ठिकाणी राहण्याचे आवाहन केले आहे. स्फोटाचे दृश्य सोशल मीडियावर व्हायरल झाले आहे. डोअरबेल कॅमेऱ्यात कैद झालेल्या व्हिडिओंमध्ये एकामागून एक होत असलेले स्फोट, प्रचंड ज्वाळा आणि धुराचे ढग स्पष्ट दिसत आहेत. स्थानिक रहिवासी जेन्ट्री स्टोव्हर यांनी सांगितले, “स्फोट इतका जबरदस्त होता की मला वाटले माझे घरच कोसळले. बाहेर पाहिले तेव्हा सगळीकडे आग आणि धूरच धूर दिसत होता.
घटनास्थळी बचाव पथके आणि अग्निशमन दल पोहोचले असून, ढिगाऱ्याखाली अडकलेल्यांचा शोध घेतला जात आहे. कारखान्याची इमारत पूर्णपणे उद्ध्वस्त झाली असून, अनेक वाहनांना आणि आसपासच्या घरांनाही नुकसान झाले आहे. टेनेसीचे काँग्रेस सदस्य स्कॉट डीजेरेल यांनी या घटनेबद्दल शोक व्यक्त करत ट्विट केले आहे. बेपत्ता कामगार आणि त्यांच्या कुटुंबीयांसाठी आम्ही प्रार्थना करत आहोत. कृपया सर्वजण पीडित आणि बचाव कर्मचाऱ्यांसाठी प्रार्थना करा. स्फोटाचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही, मात्र प्राथमिक अंदाजानुसार, कारखान्यातील रासायनिक संयुगांच्या प्रतिक्रिया किंवा उत्पादन प्रक्रियेदरम्यान झालेल्या बिघाडामुळे हा स्फोट झाला असावा. कंपनीचे मोठे नुकसान झाले असून, कोणतेही कामगार जिवंत असण्याची शक्यता फारच कमी असल्याचे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. या घटनेनंतर टेनेसीमध्ये सुरक्षा उपाययोजना अधिक कडक करण्यात आल्या आहेत आणि सर्व लष्करी उत्पादन प्रकल्पांची तपासणी सुरू करण्यात आली आहे.