मुंबई,
Jain sages announce Jankalyan Party गेल्या काही दिवसांपासून मुंबईत कबूतर खाण्याच्या मुद्द्यावरून वादंग निर्माण झाले असतानाच आता या विषयाने राजकीय व धार्मिक रंग घेतला आहे. कबूतरांच्या मृत्यूच्या पार्श्वभूमीवर जैन धर्मीयांकडून शनिवारी (11 ऑक्टोबर) मुंबईत मोठी धर्मसभा आयोजित करण्यात आली होती. या धर्मसभेनंतर उपस्थित जैन मुनींनी पत्रकार परिषद घेऊन नव्या राजकीय संघटनेची घोषणा केली. निलेश मुनी म्हणाले की , आता आमची देखील संघटना असणार आहे. आम्ही महापालिकेत आमचे उमेदवार उभे करू. या नव्या राजकीय पक्षाची घोषणा केली या पक्षाचे चिन्ह ‘कबुतर’ असणार आहे.

धर्मसभेदरम्यान जैन मुनी कैवल्य रत्न महाराज यांनी वादग्रस्त विधान करत म्हटले, मी डॉक्टरांना पण मूर्ख मानतो. एक-दोन जण मेल्याने काय होते? दररोज सामान्य माणूस मरतो, त्याचा सरकार विचार करत नाही. तसेच, जैन धर्मीय लोक सर्वात जास्त टॅक्स भरतात, असेही त्यांनी वक्तव्यात म्हटले. या वक्तव्यांवरून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते अविनाश अभ्यंकर यांनी जैन मुनींवर जोरदार हल्लाबोल केला. ते म्हणाले, टॅक्स भरताय म्हणजे काय? मग मुंबईवर तुम्ही हक्क सांगणार का? महाराष्ट्रातील मराठी माणूस हा प्रामाणिक आणि परिश्रमी आहे. तो बँक फसवून परदेशात जात नाही. मराठी माणसानेच इतरांना मुंबईत स्थान दिलं आणि आता तेच मराठी माणसावर हक्क सांगत आहेत.
एक-दोन जण मेल्याने फरक पडत नाही या वक्तव्यावर प्रतिक्रिया देताना अभ्यंकर म्हणाले, ते जर स्वतःला अहिंसावादी समजतात आणि तरीही माणूस मेल्याने फरक पडत नाही असे म्हणत असतील, तर त्यांच्या बुद्धीची कीव करावीशी वाटते. डॉक्टर आणि शास्त्रज्ञ मूर्ख आहेत का? मंदिरांना लावलेल्या जाळ्या आधी काढा, मग इतरांना ज्ञान द्या, असा टोला त्यांनी लगावला. दरम्यान, जैन मुनींच्या विधानांवर शिवसेना आमदार मनीषा कायंदे यांनीही संताप व्यक्त केला आहे. मनुष्याच्या जीविताशी संबंधित विषयाची खिल्ली उडवली गेली आहे. मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी यावर उत्तर द्यावे, अशी मागणी त्यांनी केली.