भंडारा
jaki rawalani शिवसेना शिंदे गट युवा सेनेचे भंडारा लोकसभा प्रमुख जाकी रावलानी यांनी धनुष्यबाण सोडून अखेर भाजपाचे कमळ हाती घेतले आहे. या संदर्भात तरुण भारताने प्रवेशाची शक्यता वर्तविणारे वृत्त प्रकाशित केले होते.
मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत भाजपात प्रवेश
भंडारा विधानसभेचे आमदार आणि शिवसेनेचे पूर्व विदर्भ संघटक असलेले नरेंद्र भोंडेकर यांचे अत्यंत निकटवर्तीय म्हणून रावलानी यांची ओळख होती. विधानसभेच्या निवडणुकांमध्ये त्यांची भूमिका अत्यंत महत्त्वाची असायची. सूक्ष्म नियोजन करणाऱ्यांमध्ये त्यांचा सहभाग आवर्जून असायचा. नगरपालिका निवडणुकीचे आरक्षण जाहीर झाल्यापासून काही अंशी त्यांच्यात वादाची ठिणगी पडली आणि त्याचाच परिपाक पक्ष बदलात झाला. शिवसेनेत युवकांचे चांगले संघटन रावलानी यांचे होते.
दरम्यान रावलानी यांनी भंडारा-गोंदियाचे भाजपाने नेते, विधान परिषद सदस्य डॉक्टर परिणय फुके यांच्या माध्यमातून राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेत त्यांच्या हस्ते भाजपात प्रवेश केला. रावलानी यांच्यासोबत भंडारा नगरपरिषदेचे माजी अध्यक्ष भगवान बावनकर यांनी भारतीय जनता पार्टीत प्रवेश केला आहे.या दोघांच्या प्रवेशामुळे आगामी निवडणुकीत भारतीय जनता पार्टीला मोठे पाठबळ मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. तर दुसरीकडे हा प्रवेश म्हणजे शिवसेनेसाठी मोठा धक्का मानला जात आहे. आता रावलानी भाजपा येऊन काय किमया करून दाखवितात, याची उत्सुकता सगळ्यांना असेल.
दरम्यान आज येथे जिल्हाध्यक्ष आशु गोंडाने यांनी पुष्पगुच्छ देऊन रावलानी आणि बावनकर यांचे स्वागत केले. यावेळी जिल्हा महामंत्री भगवान चांदेवार, मयूर बिसेन, कल्याणी तिरपूडे, शहराध्यक्ष सचिन कुंभलकर व अन्य उपस्थित होते.
लोकशाही असलेल्या पक्षात काम करणार : रावलानी
ज्या पक्षात कार्यकर्त्यांना गृहीत धरूनच कारभार केला जातो. त्या पक्षात काम करणे कठीण झाले होते. आ. भोंडेकरांच्या या प्रकाराला कंटाळून हा निर्णय घ्यावा लागला. भाजप सर्वसामान्यांचा पक्ष आहे. अशा पक्षात यापुढे काम करू, अशी पक्षप्रवेशानंतर जाकी रावलानी यांनी दिली.