नवी दिल्ली,
PM Kisan 21th Installment Date देशभरातील शेतकऱ्यांसाठी दिवाळीपूर्वी केंद्र सरकारकडून मोठा दिलासा मिळू शकतो. पीएम किसान सन्मान निधी योजनेच्या २१व्या हप्त्याबाबत सरकार लवकरच घोषणा करणार असल्याची माहिती समोर आली आहे. याआधी जम्मू आणि काश्मीरमधील पूरग्रस्त शेतकऱ्यांना १७१ कोटी रुपयांचे विशेष मदत पॅकेज मंजूर करण्यात आले आहे. शनिवारी केंद्र सरकारने पूर आणि भूस्खलनामुळे मोठे नुकसान झालेल्या जम्मू आणि काश्मीरमधील शेतकऱ्यांच्या खात्यात थेट १७१ कोटी रुपये हस्तांतरित केले. या मदतीमुळे प्रदेशातील शेतकऱ्यांना काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे. त्याच वेळी, देशभरातील शेतकरी पीएम किसान योजनेच्या पुढील हप्त्याची आतुरतेने वाट पाहत आहेत.
यापूर्वी, २६ सप्टेंबर रोजी सरकारने हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, पंजाब आणि हरियाणा या पूरग्रस्त राज्यांतील २७ लाखांहून अधिक शेतकऱ्यांना ५४० कोटी रुपये मदत म्हणून दिले होते. केंद्रीय कृषी मंत्री शिवराजसिंह चौहान यांनी सांगितले की, “मोदी सरकार शेतकऱ्यांप्रती संवेदनशील आहे. नैसर्गिक आपत्ती, पूर किंवा भूस्खलन यांसारख्या संकटाच्या काळातही सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी ठामपणे उभी आहे. त्यांनी पुढे सांगितले की, सरकारचा हेतू शेतकऱ्यांना तात्काळ आर्थिक मदत देऊन त्यांच्या शेतीच्या पुनर्बांधणीसाठी मदत करणे हा आहे.
सरकारने हिमाचल प्रदेशातील ८ लाखांहून अधिक शेतकऱ्यांना १६० कोटी रुपये, पंजाबमधील ११ लाख शेतकऱ्यांना २२२ कोटी रुपये, तसेच उत्तराखंडमधील ७.९ लाख शेतकऱ्यांना १५८ कोटी रुपये वितरित केले आहेत. अद्याप काही राज्यांना पीएम किसान योजनेचा २१वा हप्ता मिळालेला नाही. परंतु कृषी मंत्रालयाच्या सूत्रांनुसार, २० ऑक्टोबरपूर्वी, म्हणजेच दिवाळीच्या आधीच, या शेतकऱ्यांच्या खात्यात हप्ता जमा होईल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. केंद्र सरकारच्या या उपक्रमामुळे लाखो शेतकऱ्यांना सणासुदीच्या काळात दिलासा मिळणार असून, शेती उत्पादनासाठी लागणाऱ्या खर्चाची तरतूद सुलभ होईल. पीएम किसान सन्मान निधी योजना सध्या देशभरातील ११ कोटींहून अधिक शेतकऱ्यांना लाभ देत आहे.