सुनील शेट्टीची उच्च न्यायालयात धाव घेतली

बिनपरवानगी व्यावसायिक वापरामुळे प्रतिष्ठेला धक्का

    दिनांक :11-Oct-2025
Total Views |
मुंबई,
Suniel Shetty प्रसिद्ध अभिनेता सुनील शेट्टी यांनी स्वतःच्या फोटोंचा आणि व्यक्तिमत्त्वाचा बिनपरवानगी व्यावसायिक वापर होत असल्याचा आरोप करत बंबई उच्च न्यायालयात अंतरिम याचिका दाखल केली आहे. या याचिकेमध्ये त्यांनी विविध सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्स आणि वेबसाइट्सना त्यांचे फोटो तातडीने हटवण्याचा आणि भविष्यात त्यांचा गैरवापर होणार नाही, याची हमी देण्याचा आदेश देण्याची मागणी केली आहे.
 

Suniel Shetty 
शेट्टी यांच्या वतीने वरिष्ठ वकील वीरेंद्र सराफ यांनी न्यायमूर्ती आरिफ डॉक्टर यांच्या खंडपीठासमोर युक्तिवाद करताना सांगितले की, काही वेबसाइट्सवर अभिनेता सुनील शेट्टी आणि त्यांच्या नातवाच्या बनावट किंवा चुकीच्या संदर्भातील छायाचित्रांचा वापर केला जात आहे. विशेषतः एका रिअल इस्टेट एजन्सी आणि सट्टेबाजीसंबंधित अ‍ॅपच्या वेबसाइट्सवर शेट्टी यांचे फोटो परवानगीशिवाय वापरले जात असून, यामुळे त्यांच्या प्रतिमेला मोठा धक्का बसला आहे, असा दावा याचिकेत करण्यात आला आहे.वकील सराफ यांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले की, या प्रकारामुळे केवळ आर्थिक गैरफायदा मिळवण्याचा प्रयत्न केला जात नाही, तर शेट्टी यांच्या वैयक्तिक हक्कांचाही भंग केला जातो आहे. “सुनील शेट्टी यांच्या नावाचा, चेहऱ्याचा आणि व्यक्तिमत्त्वाचा मालकीहक्क केवळ त्यांचाच आहे. त्यामुळे त्यांचा वापर करण्यापूर्वी त्यांची स्पष्ट परवानगी घेणे कायदेशीरदृष्ट्या आवश्यक आहे,” असे सराफ यांनी युक्तिवादात नमूद केले.
 
 
 
यावर दोन्ही पक्षांचे युक्तिवाद ऐकल्यानंतर न्यायालयाने याचिकेवरील आपला निर्णय सध्या राखून ठेवला आहे. न्यायालयाच्या अंतिम निर्णयाची प्रतीक्षा सर्व संबंधित पक्ष करत आहेत.अशा प्रकारचे प्रकार यापूर्वीही अनेक नामवंत कलाकारांच्या बाबतीत घडले आहेत. अमिताभ बच्चन, ऐश्वर्या राय बच्चन, रणवीर सिंग, अनुष्का शर्मा आणि करीना कपूर यांसारख्या कलाकारांनीही आपल्या नावाचा, फोटोचा अथवा आवाजाचा परवानगीशिवाय वापर झाल्याबाबत न्यायालयात धाव घेतली होती.सध्या सोशल मीडिया आणि डिजिटल प्लॅटफॉर्म्सवर व्यक्तिमत्त्वाच्या हक्कांचा भंग होण्याचे प्रमाण झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे सेलिब्रिटींना त्यांच्या ओळखीचा आणि प्रतिमेचा गैरवापर रोखण्यासाठी कायदेशीर उपाययोजना करावी लागत आहे. सुनील शेट्टी यांची याचिका याच गंभीर प्रश्नांकडे पुन्हा एकदा लक्ष वेधते.