वृद्धाचे अपहरण करून निर्घृण खून; सर्व आरोपींना केले जेरबंद

    दिनांक :11-Oct-2025
Total Views |
तभा वृत्तसेवा
वणी, 
wani-kidnapping-murder-case : विवाहित महिलेला प्रेमसंबंधात अडकवून पळवून नेल्याच्या सूडभावनेतून एका युवकाच्या वृद्ध वडिलांची निर्घृण हत्या करणाèया तीन आरोपींना शिरपूर पोलिसांनी अवघ्या चार दिवसांत जेरबंद केले. अपहरण आणि खून प्रकरणात त्या महिलेच्या पतीसह नातेवाईक आणि वाहनचालकाचा समावेश असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे.
 
 

crime 
 
 
 
भद्रावती तालुक्यातील जुना सुमठाना येथील रहिवासी असलेल्या आरोपीची पत्नी चार महिन्यांपूर्वी गावातीलच नितेश विनायक कुडमेथे याने पळवून नेली. पत्नीच्या पळून जाण्याने संतप्त झालेला मुख्य आरोपी निलेश ढोले नितेश कुडमेथेच्या कुटुंबीयांकडे याबाबत सतत चौकशी करत होता. अशातच एक दिवस त्याने सूडभावनेतून नितेशचे वडील विनायक माधव कुडमेथे यांचे अपहरण रविवार, 5 ऑक्टोबर रोजी वणी शहरातील यवतमाळ रस्त्यावरील एका किराणा दुकानासमोरून केले.
 
 
दुसèया दिवशी सकाळी बेलोरा फाटा बसस्थानकाजवळ विनायक कुडमेथे यांचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात आढळून आला. मृताच्या दहा वर्षीय नातवाने रडत घरी येऊन आजोबांना जबरदस्ती नेल्याची माहिती दिल्यामुळे ही घटना उघडकीस आली. शिरपूर ठाण्यात खुनाचा गुन्हा नोंदवत पोलिसांनी युद्धपातळीवर तपास सुरू केला. ठाणेदार माधव शिंदे यांच्या नेतृत्वात खबरी यंत्रणा सक्रिय करून विशेष पथक गठित केले. आरोपींचे लोकेशन शोधादरम्यान ते यवतमाळ एमआयडीसी परिसरात लपले असल्याची माहिती मिळाली.
 
 
गुरुवार, 9 ऑक्टोबर रोजी दुपारी पोलिसांनी यवतमाळात छापा टाकून मुख्य आरोपी निलेश दिलीप ढोले (वय 36, जुना सुमठाना, भद्रावती), आशिष मारोती नैताम (वय 35, सास्ती गवरी, ता. राजुरा) आणि वाहनचालक मिथिलेश बिंदेश्वर जाधव (वय 55, मोरवा, जि. चंद्रपूर) यांना अटक केली.
 
 
प्रकरणाचा तपास जिल्हा पोलिस अधीक्षक कुमार चिंता, अपर पोलिस अधीक्षक व उपविभागीय पोलिस अधिकारी सुरेश दळवे यांच्या मार्गदर्शनात ठाणेदार माधव शिंदे, सपोनि रावसाहेब बुधवंत आणि त्यांच्या पथकाने केला.