नागपूर,
Egg Burji World Record महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठ (माफसू), नागपूर अंतर्गत असलेल्या नागपूर पशुवैद्यक महाविद्यालयाच्या कुक्कुट पालन शास्त्र विभागाच्या पुढाकाराने आणि प्रसिद्ध शेफ विष्णू मनोहर यांच्या सहकार्याने ५००१ अंड्यांची भुर्जी बनवून एक अनोखा जागतिक विक्रम करण्यात आला.

नागपूर पशुवैद्यक महाविद्यालयाच्या आवारात रविवार दिनांक १२ ऑक्टोबर रोजी पहाटे साडे पाच वाजल्यापासून सुरु झालेली ५००१ अंड्यांची भुर्जी बनविण्याची प्रक्रिया सुमारे नऊ वाजता यशस्वीरीत्या संपली आणि नंतर मान्यवरांसह नागरिकांनी भुर्जीची पावासह चव चाखली. अंड्यांच्या संख्येची खात्री करून आणि संपूर्ण कार्यक्रम कॅमेराबद्ध करून एकाच प्रयत्नात ५००१ अंड्यांची भुर्जी बनल्याचे समाधान झाल्यानंतर वर्ल्ड रेकॉर्डस् बुक ऑफ इंडिया च्या मुख्य संपादिका सुषमा नार्वेकर यांच्या सहीचे प्रमाणपत्र कार्यक्रमस्थळी देण्यात आले. कार्यक्रमात राज्यमंत्री आशिष जयस्वाल, नागपूरचे पोलीस आयुक्त डॉ. रवींद्र सिंगल, माफसू चे कुलगुरू डॉ. नितीन पाटील, वेंकीज इंडिया चे जनरल मॅनेजर डॉ. विजय तिजारे, माफसुचे संचालक शिक्षण आणि अधिष्ठाता डॉ. एस. व्ही. उपाध्ये, संचालक विस्तार शिक्षण डॉ. एस. डब्ल्यू. बोंडे यांच्या साक्षीने जागतिक विक्रम स्थापित करण्यात आला. या उपक्रमाद्वारे अंड्यांच्या पौष्टिक मूल्यांबद्दल आणि परवडणारे प्रथिनेयुक्त अन्न म्हणून लोकांमध्ये त्याचा वापर वाढावा या उद्देशाने जागरूकता निर्माण करण्यात आली