रिसोड,
Ideal Sarpanch award तालुक्यातील गणेशपूर, पाचंबा गट ग्रामपंचायतच्या सरपंच शोभा विजयकुमार जाधव यांना आदर्श सरपंच पुरस्कार प्रदान करण्यात आला. त्यांनी केलेल्या उल्लेखनीय विकास कामाची दखल घेत पुणे येथील नालंदा आर्गनायझेशनतव्दारे त्यांचा गौरव करण्यात आला. विष्णु बळीराम जाधव यांनी पुणे येथील एका कार्यक्रमात सदर पुरस्कार स्वीकारला.
विकास कामांचा डोंगर उभा करून गावाची शोभा वाढविणारा हा पुरस्कार मिळाल्याने सरपंच जाधव यांच्यावर सर्वस्तरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. शोभा जाधव २३ मध्ये सरपंच म्हणून कार्यरत झाल्या आहेत. त्यांनी गावाच्या विकासासाठी करोडो रुपयांची कामे खेचून आणली आहेत. त्यातील बहुतांश कामे पूर्ण झाली असून अनेक विकासात्मक कामे मंजूर करून घेतली आहेत. त्यामध्ये गणेशपुर येथील स्मशानभूमीचे सौंदर्यीकरण, पेव्हर ब्लॉक, तीर्थक्षेत्र योजनेतून नाथबाबा संस्थानचे सभा मंडप, दलीत वस्तीअंतर्गत पाचंबा गावातील मुख्य रस्त्याचे काँक्रीटिकरण, पाईपलाईन, शाळेच्या वर्गखोल्या आणि सुशोभीकरणाचा त्यामध्ये समावेश आहे. महिलांच्या सक्षमीकरणासाठी शोभा जाधव यांनी पुढाकार घेत अनेक आरोग्य शिबिरे, व्यावसायिक प्रशिक्षण, वृक्षारोपण, स्वच्छता अभियान आदी उपक्रम राबविले आहेत.
नालंदा आर्गनायझेशन यांच्या वतीने देण्यात येणारा आदर्श सरपंच पुरस्कार हा प्रेरणादायी आहे. या पुरस्कारामुळे ग्रामस्तरावर काम करणार्या लोकप्रतिनिधींचे मनोबल वाढते. एक महिला सरपंच म्हणून मला मिळालेला हा पुरस्कार ईतर महिला भगिनीसाठी प्रेरणेची वाट ठरेल अशी अपेक्षा आहे.
शोभा जाधव, सरपंच