उमेश ताकसांडे
वर्धा
Wardha police एरवी, पोलिस म्हटलं की खाकी वर्दीतला शिस्त आणि कडक काळजाचा माणूस, अशीच ओळख. पण, त्याच्यातही मन, आपुलकीच्या भावना असतातच. स्वत:च्या कुटुंबाकडे दुर्लक्ष करून जनतेच्या सुरक्षेसाठी दिवसरात्र राबणार्या पोलिसालाही माणुसकी असतेच. अशाच माणुसकीचा प्रत्यय बघायला मिळाला. वर्धा जिल्ह्यातील तब्बल १८०० पोलिस अधिकारी-कर्मचारी अतिवृष्टीने हतबल झालेल्या शेतकर्यांच्या मदतीला धावून आले. जिल्ह्यातील पोलिस अधिकारी-कर्मचारी आपल्या वेतनातून एक दिवसांचा पगार मुख्यमंत्री सहाय्यता निधीत जमा करणार असून, याबाबतची प्रक्रिया सुरू आहे. त्यामुळे फुल नाही फुलाची पाकळी म्हणून ही मदत शेतकर्यांसाठी लाखमोलाची ठरणार आहे.

निसर्गाच्या लहरीपणाचा फटका दरवर्षी शेतकर्यांना सोसावा लागतो. कधी कोरडा तर कधी ओला दुष्काळ शेतकर्यांच्या पाचवीलाच पुजलेला. यातून सुटका होत नाही तोच पिकांवर विविध रोगांचा प्रादुर्भाव उभा ठाकतो. एवढा डोंगर पार केल्यानंतरही संकटं कमी व्हायचे नाव घेत नाही. ऐन उत्पन्न निघाल्यानंतर शेतमालाला भाव मिळत नाही. त्यामुळे शेतकर्यांवर कर्जाचा डोंगर उभा होतो. नाईलाजास्तव बळीराजाला टोकाचे पाऊल उचलावे लागते.
पेरण्या आटोपल्यानंतर ऐन जून महिन्यात पावसाने दगा दिला. ज्यांच्याकडे सिंचनाची सोय होती त्यांचे फावले. जुलै महिन्यात पिकांना संजिवनी देणारा पाऊस पडला. त्यामुळे सोयाबीन आणि कापसाचे पीक बहरू लागले. शेतकर्यांच्या चेहर्यावरही आनंद दिसू लागला. मात्र, हा आनंद जास्त काळ टिकू शकला नाही. जिल्ह्यात जुलै सप्टेंबर पर्यंत तीन ते चार वेळा अतिवृष्टी झाली. शेतजमिनी पिकांसह खरडून निघाल्या. नदी-नाल्यांना पूर आल्याने शेतपिकं पाण्याखाली येऊन शेतात चिखल झाला. शेतकर्यांना मदत म्हणून सरकारनेही दानदात्यांसाठी दरवाजे उघडले. मुख्यमंत्री सहाय्यता निधीकरिता अनेकांनी हात पुढे केले असतानाच वर्धा जिल्ह्यातील १८०० पोलिस अधिकारी आणि कर्मचार्यांनीही आपल्या वेतनातून एक दिवसाचा पगार शेतकर्यांच्या मदतीसाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधीत जमा करणार असल्याची माहिती आहे.
वरिष्ठ पातळीवरून तशा सूचना मिळाल्या आहेत. यासंदर्भात स्टाफसह बैठक घेऊन मत जाणून घेणार आहो. कर्मचार्यांच्या सहमतीनेच आपण त्यांच्या वेतनातून एक दिवसाचा पगार मुख्यमंत्री सहाय्यता निधीकडे सुपूर्द करू. सध्या प्रक्रिया सुरू असून दिवाळीनंतर कर्मचार्यांच्या सहमतीनेच याबाबतची भूमिका स्पष्ट होईल, अशी माहिती पोलिस अधीक्षक अनुराग जैन यांनी तरुण भारतशी बोलताना दिली.