वर्धा,
Pankaj bhoyar वर्धा शहर व सेवाग्राम परिसरात पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी शासनाने मंजूर केलेल्या सेवाग्राम विकास आराखड्यातील प्रलंबित कामे तातडीने पूर्ण करण्याच्या सूचना पालकमंत्री डॉ. पंकज भोयर यांनी केल्या.
जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी वान्मथी सी., मुख्य कार्यकारी अधिकारी पराग सोमन, पोलिस अधीक्षक अनुराग जैन, उपवनसंरक्षक हरविर सिंग, जिल्हा नियोजन अधिकारी अनिरुद्ध राजुरवार, कार्यकारी अभियंता सतिश अंभोरे, उप अभियंता महेश मोकलकर उपस्थित होते.
सेवाग्राम विकास आराखडा अंतर्गत २४४.०८ कोटी किंमतीच्या आराखड्यास शासनाने प्रशासकीय मान्यता प्रदान केली आहे. यात १४५ कामांना मंजुरी मिळाली असून त्यापैकी १०७ कामे पूर्ण झाली आहेत. सेवाग्राम विकास आराखड्यातील कामे संथगतीने होत असून विकास कामांना गती देण्यात यावी. प्रलंबित कामे पूर्ण करण्याच्या अनुषंगाने असलेल्या अडचणींचा आढावा पालकमंत्री डॉ. भोयर यांनी घेतला. धाम नदीच्या काठावर तसेच इको फॉरेस्ट उद्यानाकरिता ड्रिप इरिगेशन, वरुड व पवनार येथील सिमेंट रस्ते, पवनार व वरुड येथील ग्रापं भवन, वरूड येथील खुल्या जागेचे सौंदर्यीकरण, लक्ष्मीनाराण मंदिर येथील हेरीटेज ट्रेल, व्हिजीटर फॅसिलिटी सेंटर, हेरीटेज नोडवर माहिती फलक आदींचा आढावा घेतला. सर्व विभागांनी आपसी समन्वय ठेवून कामे पूर्ण करण्यावर भर द्यावा. उर्वरित कामे तातडीने पूर्ण करण्याचे निर्देश ना. भोयर यांनी दिले.
सेवाग्राम येथे येणार्या पर्यटकांना महात्मा गांधी यांचा संपूर्ण परिचय असलेला निरंतर गांधी, राष्ट्रपिता महात्मा गांधी, एक अनुभूती हे विशेष इंटरअॅटीव प्रदर्शन, मल्टीमीडिया तंत्रज्ञानाचा वापर करुण दाखविण्यात येणार आहे. या प्रदर्शनीचे काम जे. जे. स्कूल ऑफ आर्ट मुंबई यांनी कालमर्यादेत पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या. सेवाग्राम आश्रम येथे तयार करण्यात येणार्या आर्ट गॅलरीत असणार्या साहित्य सामग्री बाबत सादरीकरण करण्यात यावे, असे त्यांनी सांगितले.