वर्धा,
travel theft, बसने प्रवास करीत असलेल्या प्रवाशाच्या खिशातील १ लाख रुपयांची रोकड अज्ञात चोरट्याने लंपास केल्याची घटना तक्रारीनंतर उघडकीस आली. कारंजा पोलिसांनी प्राप्त तक्रार पुढील कारवाईसाठी तळेगाव पोलिसांकडे वर्ग केली आहे.
गणेशनगर येथील रहिवासी सुनील मानमोडे (५९) हे १२ रोजी तळेगाव येथे गेले होते. तिथून त्यांनी आपल्या मुलीच्या लग्नाच्या पत्रिका आणि १ लाख रुपयांची रोख घेतली होती. ते तळेगाव (श्या. पंत) येथून कारंजा येथे जाण्यासाठी एम. एच. १४ एल. एस. १०९२ क्रमांकाच्या बसमध्ये चढले. प्रवासादरम्यान चोरट्याने त्यांच्या खिशातील रोकड चोरली. कारंजा जवळ आल्यानंतर त्यांना खिशातील पैसे चोरट्याने चोरल्याचे लक्षात आल्यावर त्यांनी ही माहिती बसच्या चालक व वाहकाला दिली. यामुळे बसमधील ७४ प्रवाशांमध्ये एकच खळबळ उडाली. त्यानंतर बस कारंजा पोलिस ठाण्यात नेण्यात आली. पोलिसांनी बसमधील सर्व प्रवाशांची तपासणी केली. तसेच बसचीही पाहणी केली. मात्र, रोकड मिळून आली नाही. तळेगाव बसस्थानकावरच सुनील मानमोडे यांचा खिसा चोरट्याने कापला असावा, असा अंदाज पोलिसांचा असून मानमोडे यांची तक्रार पुढील कारवाईसाठी तळेगाव पोलिसांकडे वळती करण्यात आली आहे.