वाईल्ड अजाईल फाऊंडेशनतर्फे 'जीवनधारा’ उपक्रमाला सुरुवात

शाळांकडून उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद

    दिनांक :12-Oct-2025
Total Views |
नागपूर,
Wild Agile Foundation वाईल्ड अजाईल फाऊंडेशन या स्वयंसेवी संस्थेतर्फे ‘जीवनधारा’ हा प्रेरणादायी उपक्रम नुकताच सुरू करण्यात आला आहे. या उपक्रमाचा उद्देश शालेय विद्यार्थ्यांमध्ये वन्यजीव आणि पर्यावरण संरक्षणाविषयी जागरूकता निर्माण करणे असा आहे.
 

Wild Agile Foundation 
वन्यजीव सप्ताह २०२५ दरम्यान पहिल्या टप्प्यात नागपूर जिल्हा परिषदेच्या डिजिटल शाळांमध्ये ‘जीवनधारा’ उपक्रम राबवण्यात आला. जीवनधाराच्या माध्यमातून २१ शाळांमधील अडीच हजारहून अधिक विद्यार्थ्यांपर्यंत वन्यजीव आणि पर्यावरण संरक्षणाचा संदेश पोहोचविण्यात आला. वन्यजीव जागरूकता आणि शैक्षणिकदृष्ट्या तयार करण्यात आलेला माहितीपट विद्यार्थ्यांमध्ये उपक्रमातील मुख्य आकर्षण ठरला. विद्यार्थ्यांना हा माहितीपट दाखवून निसर्गसंवर्धन, स्थानिक जैवविविधता आणि सहअस्तित्वाचे महत्त्व समजावून सांगण्यात आले. या उपक्रमाचे नियोजन आणि अंमलबजावणी दीप्ती पंडे आणि स्मृती चोबितकर यांनी केले. तर वाईल्ड अजाईल फाऊंडेशनचे संस्थापक प्रफुल देशमुख तसेच पराग चोबितकर आणि सारंग अनारसे यांच्या सहकार्याने संपूर्ण टीमने हा उपक्रम यशस्वीरीत्या पूर्ण केला. याबाबत बोलताना प्रफुल देशमुख म्हणाले, ‘जीवनधारा’ हा केवळ एक उपक्रम नाही, तर ही चळवळ आहे. निसर्गाशी सहअस्तित्वाची जाणीव निर्माण करणे आणि पर्यावरण संवर्धनासाठी पुढील पिढीला सक्षम बनवणे, हा वाईल्ड अजाईल फाऊंडेशनचा स्पष्ट उद्देश आहे. दरम्यान, शाळांकडूनही या उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून, अनेक शाळांनी अशा प्रकारचे शैक्षणिक आणि प्रेरणादायी कार्यक्रम नियमितपणे आयोजित करण्याची विनंती केली आहे.