जेरुसलेम
donald trump अमेरिकेचे माजी राष्ट्रपती डोनाल्ड ट्रंप यांनी इजरेलच्या संसदेत – नेसेटमध्ये – सोमवारी एक ऐतिहासिक भाषण करत शांतीच्या नव्या पर्वाची सुरुवात जाहीर केली. 'आजचा दिवस अपार आनंदाचा, आशेचा आणि सर्वशक्तिमान ईश्वराचे आभार मानण्याचा आहे,' असे ट्रंप यांनी भावूक शब्दांत सांगितले. त्यांच्या स्वागतासाठी संपूर्ण नेसेट उभं राहिलं आणि 'दुनियेला ट्रंपसारख्या नेत्याची गरज आहे' अशा घोषणा देत त्यांचा सन्मान करण्यात आला.
हे भाषण अशा वेळी घडलं आहे जेव्हा गाझामधील दीर्घ संघर्षानंतर 'गाझा पीस प्लान' अंतर्गत हमासने २० बंधकांची सुटका केली आहे. या पार्श्वभूमीवर ट्रंप यांनी केलेल्या भाषणाला जागतिक स्तरावर विशेष महत्त्व प्राप्त झालं आहे.ट्रंप म्हणाले, “आज अनेक वर्षांनंतर या पवित्र भूमीवर सूर्य उगवतो आहे. बंदुका शांत आहेत, सायरनचे आवाज थांबले आहेत. ही केवळ युद्धाची समाप्ती नाही, ही दहशतवाद आणि मृत्यूच्या काळाचा शेवट आहे. ही शांतीची खरी सुरुवात आहे. हे क्षेत्र आता खऱ्या अर्थाने मध्यपूर्वेतील एक तेजस्वी प्रदेश बनेल.”
यावेळी ट्रंप यांनी इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांचे विशेष उल्लेख करत त्यांच्या शौर्याचे कौतुक केले. “बिबी (नेतन्याहू) यांच्याशी संवाद साधणं सोपं नाही, पण त्यांच्यातील ठामपणा आणि जिद्द यामुळेच ते महान नेता ठरतात,” असे ते म्हणाले.ट्रंप यांच्या भाषणाआधी पंतप्रधान नेतन्याहू यांनीही नेसेटमध्ये संबोधन करत ट्रंप यांचे मनःपूर्वक आभार मानले. “दोन वर्षांच्या दीर्घ संघर्षानंतर, आज आपण युद्धाचा शेवट पाहतो आहोत. ट्रंप यांनी या शांती प्रक्रियेसाठी जी निष्ठा दाखवली आहे, ती जगासाठी प्रेरणादायी आहे. जगाला ट्रंपसारख्या नेत्यांची गरज आहे,” असे नेतन्याहू यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले.
नेसेटचे सभापती अमीर ओहाना यांनी ट्रंप यांना नोबेल शांतता पुरस्कारासाठी सर्वोत्तम उमेदवार असल्याचे म्हटले. “इस्रायल त्यांना पुढील वर्षी या पुरस्कारासाठी नामांकित करणार आहे,” असे त्यांनी जाहीर करत ट्रंप यांच्या भूमिकेचे विशेष कौतुक केले. “या वर्षीच्या सुरुवातीला इराणसोबत झालेल्या १२ दिवसांच्या युद्धात आणि हमाससोबतच्या युद्धविरामात ट्रंप यांचे योगदान अमूल्य होते,” असे ओहाना यांनी अधोरेखित केले.“राष्ट्रपती महोदय, हजारो वर्षांनंतरही यहुदी लोक तुम्हाला आठवतील. आमचा देश असा आहे, जो कधीच विसरत नाही. या ग्रहावर असा एकही नेता नाही ज्याने शांतीसाठी तुमच्याइतकं काम केलं आहे,” असे ओहाना यांनी आपल्या भाषणात ठामपणे सांगितले.
या ऐतिहासिक प्रसंगी ट्रंप यांचे नेसेटमध्ये स्वागत केलं गेलं, तेवढ्याच उत्साहात त्यांच्या शांतीच्या संदेशाला प्रतिसादही मिळाला. मध्यपूर्वेमधील या नव्या शांती पर्वाला आता जागतिक समुदायाकडूनही मोठी आशा लागली आहे.