कारंजा
RSS संघ शंभर वर्षाचा झाला आहे. शंभर वर्षे म्हणजे नैसर्गिक प्रवास असतो. ज्यावेळी आपण संघाचा विचार करतो तेव्हा संघाचे एक वैशिष्ट्य आहे. संघ वर्धिष्णू आहे. १९२५ ला विजयादशमीच्या शुभमुहूर्तावर मोहिते संघस्थानावर नागपूरला संघाची पहिली शाखा लागली होती आणि आज संघाच्या ८४ हजार शाखा आहेत. पंचावन्न देशामध्ये संघाच्या शाखा लागतात, १२५ देशामध्ये संघाचा संपर्क आहे. आज संघ एक वटवृक्ष झाला आहे. संघ स्वयंसेवकांच्या परिश्रमाने व तपश्चर्याने मोठा झाला असल्याचे मार्गदर्शन संत विमर्श महाराष्ट्र राज्यचे संयोजक आष्टी शहीद येथील डॉ. प्रा. सुभाष लोहे यांनी केले.
गुरुकुल पब्लिक स्कूल येथे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ कारंजा (घा.) शाखेच्या विजयादशमी उत्सवात प्रमुख वते म्हणून बोलत होते. प्रमुख अतिथी म्हणून गजानन महाराज संस्थान कारंजा येथील अध्यक्ष उमेश पायघन होते तर व्यासपीठावर रामटेक विभाग संघचालक जयंत मूलमुले, कारंजा खंड संघचालक सुनील कडू उपस्थित होते.
डॉ. प्रा. लोहे पुढे म्हणाले की, समाजाचे मनोबल टिकविण्याचे कार्य आपल्या संतांनी केलेले आहे. ज्ञानेश्वर माउलींनी आळंदी ते पंढरपूर वारी काढली. सगळ्या लोकांना एकत्र केले आणि माध्यम होते ते फत परमेश्वराची भती. या परमेश्वर भतीच्या आधारावर संपूर्ण समाजाला एकत्र केले. ज्यावेळी ब्रिटीशांचे साम्राज्य होते तेव्हा सुद्धा एकोणिसाव्या शतकाच्या मध्यामध्ये आध्यात्मिक चेतना निर्माण केली. स्वामी दयानंद स्वरस्वती, रामकृष्ण परमहंस, स्वामी विवेकानंद, रवींद्रनाथ टागोर आदींनी आध्यात्मिक चेतना निर्माण केली आणि पुढे या बाबींचा उपयोग सुद्धा झाल्याचे ते म्हणाले. हिंदू समाज आपला स्व विसरत होता. आपले वंदे मातरम जे गीत आहे याचेही विभाजन झाले. या सर्व परिस्थितीचे जेव्हा डॉ. हेडगेवार अवलोकन करतात आणि मग त्यांना वाटते की या समाजाचे मला संघटन करायचे आहे आणि हरवलेला स्व प्राप्त करून घ्यायचे आहे. त्यासाठी त्यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची स्थापना करून हे हिंदू राष्ट्र आहे अशी गर्जना डॉ. हेडगेवार यांनी केल्याचे डॉ. लोहे म्हणाले.
उत्सवापूर्वी स्वयंसेवकांचे शिस्तबद्ध पथसंचलन निघाले. स्वयंसेवकांनी व्यायाम सांघिक गीत, योग, दंड व्यायाम योग व समतेचे प्रात्यक्षिक केले. प्रस्ताविक खंड कार्यवाह जयंत टावरी यांनी केले. सुभाषित श्रीजित भोकरे, अमृतवचन आशिष गांधी व वैयक्तिक गीत हेमंत मानमोडे यांनी केले. उत्सवाला मोठ्या संख्येने नागरिकांची उपस्थिती होती.