जेरुसलेम
donald trump गाझामधील ऐतिहासिक युद्धविराम करारानंतर अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सोमवारी इस्रायली संसदेला भेट दिली. त्यांच्या या दौऱ्यादरम्यान इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी ट्रम्प यांना देशातील सर्वोच्च नागरी पुरस्कार देऊन गौरवले. या सोहळ्यानंतर ट्रम्प यांनी आपल्या भाषणातून नव्या शांततेचा संदेश दिला.
गाझामधून २० बंदकांची सुटका झाल्याची माहिती देत ट्रम्प म्हणाले, “आज बंदुका शांत आहेत, सायरन शांत आहेत. ईश्वराच्या इच्छेने ही भूमी आणि संपूर्ण प्रदेश सदैव शांततेत राहो.” त्यांनी या कराराला ‘सद्भावनेची सुरुवात’ आणि ‘नव्या मध्यपूर्वेचा ऐतिहासिक उदय’ असे संबोधले.
ट्रम्प यांनी नेतन्याहूंच्या नेतृत्वाचेही कौतुक केले. “नेतन्याहूंसोबत वाटाघाटी करणे सोपे नाही. पण हेच त्यांना महान नेतृत्त्व देतात. हा काळाच्या ओघातला एक विलक्षण वळण आहे,” असे त्यांनी म्हटले. त्यांनी गाझा करारामुळे स्थिरता आणि युद्धविराम निर्माण झाल्याचे नमूद करताना सांगितले की, “आकाश शांत आहे, बंदुका थांबल्या आहेत आणि पवित्र भूमीवर पुन्हा एकदा शांती नांदते आहे.”
दरम्यान, ट्रम्प यांच्या भाषणादरम्यान संसदेत उपस्थित एका व्यक्तीने जोरदार घोषणाबाजी करत त्यांचा विरोध केला. सुरक्षारक्षकांनी तात्काळ हस्तक्षेप करून संबंधित व्यक्तीला सभागृहाबाहेर नेले.गाझा संघर्षानंतर स्थापन झालेली शांतता आणि ट्रम्प यांच्या भूमिकेमुळे नव्या राजकीय समीकरणांची चर्चा रंगू लागली आहे. ट्रम्प यांनी पुन्हा एकदा मध्यपूर्वेतील शांतता प्रक्रियेत स्वतःला केंद्रस्थानी आणले असून, या दौऱ्यामुळे जागतिक राजकारणात नव्या घडामोडी घडण्याची शक्यता वर्तवली जात आहे.