पर्थ,
effect of Covid on men's sperm जग कोविड-१९ साथीशी झुंजत असताना जगभराचे लक्ष संसर्ग प्रतिबंध, उपचार आणि लसींवर केंद्रित होते. परंतु काही वर्षांनी केलेल्या नवीन संशोधनातून मोठा निष्कर्ष समोर आले आहेत. या विषाणूने केवळ संक्रमित व्यक्तीवरच परिणाम केला नाही तर नाही, तर त्या पुरुषांच्या शुक्राणूंवरही परिणाम करू शकतो, विशेषतः जर संसर्ग गर्भधारणेपूर्वी झाला असेल तर. ऑस्ट्रेलियातील फ्लोरी इन्स्टिट्यूट ऑफ न्यूरोसायन्स अँड मेंटल हेल्थ येथे केलेल्या अभ्यासात असे आढळले आहे की, कोविड-१९ संसर्गामुळे पुरुषांच्या शुक्राणूंमध्ये बदल होऊ शकतात, ज्याचा परिणाम पुढच्या पिढीच्या मेंदूच्या विकासावर आणि वर्तनावर होतो. हे निष्कर्ष नेचर कम्युनिकेशन्स या वैज्ञानिक जर्नलमध्ये प्रकाशित झाले आहेत.

या संशोधकांनी उंदरांवर प्रयोग करून पाहिले. नर उंदरांना सार्स-को वी-2 ने संक्रमित केले आणि नंतर त्यांना निरोगी मादी उंदरांसह प्रजननासाठी ठेवले. संसर्गातून बरे झालेल्या नर उंदरांच्या संततीने ज्या उंदरांच्या वडिलांना कधीही संसर्ग झाला नव्हता त्यांच्यापेक्षा जास्त चिंताग्रस्त वर्तन दाखवले. विशेषतः मादी संततीवर तणावाशी संबंधित जनुकांचा प्रभाव दिसून आला. हिप्पोकॅम्पस या मेंदूच्या भागात, जो भावना आणि मूड नियंत्रित करतो यात लक्षणीय बदल आढळले. संशोधकांना असे आढळले की कोविड-१९ संसर्गानंतर पुरुषांच्या शुक्राणूंमध्ये नॉन-कोडिंग आरएनएमध्ये बदल होतात. हे रेणू थेट प्रथिने तयार करत नाहीत, परंतु जीन्स चालू आणि बंद करतात. त्यामुळे कोणते जीन्स सक्रिय आहेत आणि कोणते नाही हे ठरते, जे शरीराच्या वाढीवर आणि वर्तनावर परिणाम करतात. अशा बदलांना वैज्ञानिकदृष्ट्या एपिजेनेटिक बदल म्हणतात.
पुढील टप्पा म्हणजे मानवांमध्ये समान अभ्यास करणे. कोविड-१९ मधून बरे झालेल्या पुरुषांच्या शुक्राणूंची तपासणी करून त्यांच्या मुलांमध्ये मानसिक किंवा वर्तणुकीशी संबंधित बदल आहेत का हे पाहणे आवश्यक आहे. जर ही प्रक्रिया मानवांमध्ये सिद्ध झाली, तर याचा परिणाम लाखो कुटुंबांवर होऊ शकतो. या संशोधनातून कोविड-१९ ला एका नवीन दृष्टिकोनातून पाहिले जात आहे: तो केवळ श्वसन रोग नाही, तर मानवी पुनरुत्पादन आणि भावी पिढ्यांच्या मानसिक आरोग्यावरही परिणाम करणारा विषाणू आहे.