गुजरात,
Gujarat domestic violence case गुजरातच्या कच्छ जिल्ह्यातील भुज तालुक्यातील सामत्रा गावात एक धक्कादायक घटना समोर आली आहे. पैशांवरून सुरू झालेल्या वादातून एका पत्नीने आपल्या पतीवर ज्वलनशील द्रव्य टाकून त्याला पेटवून दिले. गंभीररीत्या भाजलेल्या पतीचा उपचारादरम्यान मृत्यू झाला असून, पोलिसांनी आरोपी पत्नीला अटक केली आहे.
ही घटना शनिवार, ११ ऑक्टोबर रोजी संध्याकाळी सुमारे पाच वाजण्याच्या सुमारास घडली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृतकाचे वय सुमारे ६५ वर्षे होते. त्याने आपली पहिली पत्नी निधनानंतर सुमारे दीड वर्षांपूर्वी दुसरे लग्न केले होते. दुसऱ्या पत्नीशी सतत वाद सुरू असायचे, विशेषतः पहिल्या पत्नीचे १८ तोळे सोने घेण्यावरून दोघांमध्ये बरेच वेळा भांडणे होत होती.घटनेच्या दिवशीही भुज शहरात घेतलेल्या नवीन घराच्या व्यवहारासंदर्भात दोघांमध्ये वाद झाला होता. पत्नीने पतीकडून पैसे मागितले, मात्र त्याने पैसे देण्यास नकार दिला. याच गोष्टीवरून संतप्त झालेल्या पत्नीने गैराजमधून ज्वलनशील द्रव (केरोसिन अथवा तत्सम पदार्थ) आणून पतीच्या अंगावर ओतले आणि माचीस पेटवली. पती जागीच आगीच्या ज्वाळांमध्ये झळपला.
गंभीर भाजल्याने त्याला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र दुसऱ्या दिवशी, रविवारी संध्याकाळी उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. मृतकाला तीन मुले आहेत, यापैकी दोन परदेशात वास्तव्यास आहेत. ही माहिती मिळताच नातेवाइकांनी पोलिसांत तक्रार दाखल केली.भुज पोलिसांनी तत्काळ कारवाई करत आरोपी पत्नीविरुद्ध हत्या (IPC 302) अंतर्गत गुन्हा दाखल करून तिला अटक केली आहे. सध्या तिच्याकडून अधिक तपास केला जात आहे. पतीच्या हत्या मागील कारणांमध्ये केवळ आर्थिक वादच नव्हे, तर दैनंदिन कौटुंबिक ताण-तणावही असल्याची शक्यता तपास यंत्रणा व्यक्त करत आहेत.संपूर्ण प्रकरणाचा अधिक तपशील पुढील तपासानंतरच स्पष्ट होणार असला, तरी या घटनेमुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे. सामाजिक संस्थांनी अशा घटनांवर चिंता व्यक्त केली असून, कौटुंबिक वादांच्या सुसंवादाने सोडवणुकीवर भर देण्याची गरज व्यक्त केली आहे.