कटेझरी येथे नक्षल स्मारक उद्ध्वस्त

    दिनांक :13-Oct-2025
Total Views |
धानोरा,
katezhari naxal memorial demolition नक्षल्यांनी तालुक्यातील मुरुमगाव पोलिस स्टेशन अंतर्गत येणार्‍या कटेझरी पोलिस मदत केंद्रातील जंगल परिसरात नक्षल स्मारक उभारले होते. सदर स्मारक पोलिसांनी दुसर्‍यांदा उद्ध्वस्त करीत तेथे वृक्षारोपण केले व शांततेचा संदेश दिला.
 

katezhari naxal memorial demolition 
पोलिस अधीक्षक नीलोत्पल, अप्पर पोलिस अधीक्षक अभियान एम. रमेश, अप्पर पोलिस अधीक्षक (प्रशासन) गोकुळराज जी, अप्पर पोलिस अधीक्षक (अहेरी) कार्तिक यांच्या संकल्पनेतून व उपविभागीय पोलिस अधिकारी तथा एएसपी अनिकेत हिरडे यांच्या मार्गदर्शनाखाली 12 ऑक्टोबर रोजी पोलिस स्टेशन कटेझरीचे प्रभारी अधिकारी अजय भोसले यांच्या नेतृत्वात जिल्हा पोलिस तसेच एसआरपीएफ गट 11 चे 19 अंमलदार नक्षल विरोधी अभियान राबवित होते. दरम्यान कटेझरी पासून 10 ते 12 किलोमीटर अंतरावर दराची जंगल परिसरात नक्षलवाद्यांनी बांधून ठेवलेले नक्षल स्मारक उद्ध्वस्त करण्यात आले. हे स्मारक नक्षलवाद्यांच्या दहशतीचे व अस्तित्वाचे प्रतीक म्हणून बांधण्यात आले होते. अशा प्रकारची स्मारके स्थानिकांमध्ये भीती निर्माण करतात तसेच नक्षलवादास अप्रत्यक्ष प्रोत्साहन देतात.
 
 
कटेझरी पोलिस स्टेशनचे प्रभारी अधिकारी अजय भोसले यांनी गावकर्‍यांना मार्गदर्शन करताना सांगितले की, समाजात दहशत पसरवणारी प्रतिके पाडून त्याऐवजी शांतता, सुरक्षितता व विकासाचा मार्ग दृढ करणे हाच आमचा उद्देश आहे. सदर नक्षल स्मारक पाडत असताना सुरक्षिततेची पूर्ण काळजी घेण्यात आली. संपूर्ण परिसर बीडीडीएस टीमकडून सर्च करण्यात आला. नक्षल स्मारक पाडत असताना गावकर्‍यांचे सहकार्य मिळाले. त्यामुळे स्थानिकांच्या सहकार्याने स्मारक पाडण्यात आले. व त्याठिकाणी शांततेचे प्रतीक म्हणून वृक्षारोपण करण्यात आले.