वर्धा,
Dr. Pankaj Bhoyar नागपूर-मुंबई समृद्धी शिघ्रगती मार्गावर वाढलेली वाहनांची संख्या, वाहन चालकांकडून होणारी नियमांची पायमल्ली व यातून दररोज होणार्या अपघातांना आळा घालण्यासाठी मार्गावर १५ ठिकाणी पोलिस मदत केंद्र उघडण्यात येणार आहे. या संदर्भातील कार्यवाहीचा राज्याचे गृह राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर यांनी आढावा घेत संबंधितांना सूचना केल्या.
विशेष पोलिस महानिरीक्षक नागपूर यांच्या कार्यालयात सोमवारी आढावा बैठक घेण्यात आली. यावेळी नागपूर विभागाचे विशेष पोलिस महानिरीक्षक संदीप पाटील, महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचे उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक अनिलकुमार गायकवाड, सहव्यवस्थापकीय संचालक, महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या मुख्य अभियंता एन. एस. अन्सारी, सुरवशे, तरोडकर, मालखंडाले, पोलिस अधीक्षक महामार्ग वाहतूक पोलिसचे ठाणे, छत्रपती संभाजी महाराजनगर, नागपूर, कार्यकारी अभियंता सुरेश अभंग, अतिरित पोलिस अधीक्षक यशवंत सोळंके तसेच संबंधित अधिकारी प्रत्यक्ष व आभासी पद्धतीने उपस्थित होते.
राज्यातील राष्ट्रीय व राज्य मार्गावर ६३ मदत केंद्र व १३ सहाय्यता केंद्र कार्यान्वित आहे. समृद्धी महामार्ग वाहनांची गती १२० किमी प्रती तास ठेवण्यात आली असली तरी चालक यापेक्षा अधिक वेगाने वाहने चालवितात. मात्र, समृद्धी महामार्गासाठी स्वतंत्र मनुष्यबळ उपलब्ध नसल्याने बेदरकारपणे वाहन चालविणार्यांना आळा घालणे शय नसल्याने आता पोलिस मदत केंद्र स्थापित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सध्यास्थितीत तात्पुरत्या स्वरूपात २७ अधिकारी व १४७ अंमलदार यांची नियमितपणे दैनदिन कर्तव्याकरिता नेमणूक करण्यात आली. परंतु, मनुष्यबळ कमी असल्याने त्यांच्यावर प्रचंड ताण येत असल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे वाहतूक नियमांची काटेकोरपणे अंमलबजावणीसाठी १५ पोलिस मदत केंद्र स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला.
समृद्धी महामार्गावरील वायफळ, येळाकेळी, धामणगाव, गावनेर शिवणी, कारंजा लाड, मालेगाव जहांगीर, दुसरबीड, सिंदखेड राजा, जालना, छत्रपती संभाजीनगर, हडस-पिंपळगाव, शिर्डी, सिन्नर, इगतपुरी, शहापूर येथील पोलिस मदत केंद्र व छत्रपती संभाजीनगर येथे नियंत्रण कक्ष स्थापित करण्यात येणार आहे. प्रत्येक केंद्रासाठी एक एपीआय, दोन पीएसआय, तीन एएसआय, १८ पोलिस शिपाई व ३ वाहन चालक असे ३७ अधिकारी व कर्मचारी लागणार आहे. १५ पोलिस मदत केंद्र व १ नियंत्रण कक्षासाठी १६ एपीआय, ३२ पीएसआय, ४८ एएसआय, २७६ शिपाई व ४८ चालक असे ४२० कर्मचारी लागणार आहे.
...चौकट...
प्रत्येक केंद्रासाठी चारचाकी वाहन १६, मोटरसायकल १६, स्पीडगन १५, टिंटमीटर १५, ब्रेथ अॅनालायझर १५, मोबाईल फोन, संगणक, प्रिंटर, टेलिव्हिजन, डिजीटल बिनतारी संच, डिजीटल रिपीटर संच, वॉकी टॉकी, वायरलेस टावर सह अन्य साधन सामुग्री लागणार आहे. निर्धारीत करण्यात आलेल्या ठिकाणी ३ हजार चौरस फुटाचे पोलिस मदत केंद्र उभारण्यात येणार आहे.