तभा वृत्तसेवा वणी,
rss राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कामामुळे चारित्र्यवान व्यक्तींची निर्मिती होत असते. आज संघाच्या प्रेरणेने भारतासह जगातील विविध 60 देशांत दोन लाखांहून अधिक सेवा प्रकल्प सुरू आहेत. भारतीय आचार विचार व जीवन पद्धती जगाचे मार्गदर्शक बनून कल्याण करू शकते. विश्वाच्या कल्याणाची भावना हेच हिंदुत्व आहे, असे रोखठोक प्रतिपादन सेवांकुर प्रकल्पाचे कोषाध्यक्ष डॉ. प्रणाम सदावर्ते यांनी केले. ते वणी नगरच्या विजयादशमी उत्सवात प्रमुख वक्ते म्हणून बोलत होते.
या उत्सवात प्रमुख अतिथी म्हणून भांडेवाडा येथील विदेही संत जगन्नाथ महाराज संस्थानचे अध्यक्ष बबन धानोरकर होते. व्यासपीठावर तालुका संघचालक हरिहर भागवत व नगर संघचालक किरण बुजोने उपस्थित होते.आपला विषय मांडताना डॉ. सदावर्ते म्हणाले, आपण विजयादशमी उत्सवात शस्त्रांचे केले जाणारे पूजन हे आपल्या पराक्रमाची व शौर्याची आठवण करून देते. आजपासून 100 वर्षांपूर्वी डॉ. केशव बळीरामपंत हेडगेवार यांनी भारतमातेच्या पुत्रांमधील चिंतेची न्यूनगंडतेची भावना काढून टाकून, व्यक्ती निर्माणातून राष्ट्राच्या पुनरुत्थानाचे काम सुरू केले.
याद्वारे त्यांनी हिंदुत्वाच्या विचारांना पुनर्जागृत केले. त्या कामाचे आज वटवृक्षात रूपांतर झाले आहे. व्यक्तीमध्ये दोष असू शकतात. त्यामुळे त्यांनी भगव्या ध्वजाला गुरुस्थानी ठेवले. संघात व्यक्ती निर्माणाचे केंद्र संघाची शाखा आहे. यातून निर्माण झालेल्या चारित्र्यवान स्वयंसेवकांमुळे व्यवस्था परिवर्तन शक्य झाले. यातून कोणाचे अहित न करता विश्व कल्याणासाठी आपल्याला विश्वगुरू व्हायचे आहे, असे ते म्हणाले.शताब्दी वर्षात संघाने पंच परिवर्तनातून समाज परिवर्तन करण्याचे निश्चित केले आहे. यातून कुटुंबव्यवस्था बळकट करणे, नागरिकांना नागरी कर्तव्यपालनाचे महत्व सांगणे, पारदर्शक आर्थिक व्यवहार, पर्यावरणाचे संतुलन राखणे, सामाजिक समरसता निर्माण करणे आणि स्वदेशी आचरण यांसाठी जागरण करण्याचे काम संघाच्या वतीने करण्यात येत आहे, असे डॉ. प्रणाम सदावर्ते म्हणाले.
याप्रसंगी पाहुण्यांचा परिचय व प्रास्ताविक नगर संघचालक किरण बुजोने यांनी केले. सांघिक गीत अॅड. प्रेमकुमार धगडी, सुभाषित शंतनू पिंपळकर, अमृतवचन कृष्णकुमार पानेरी, वैयक्तिक गीत प्रवीण सातपुते यांनी सादर केले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मुख्य शिक्षक कवडू पिंपळकर यांनी केले.