रिसोड,
soybean crop fire, रिसोड तालुयातील गोवर्धन येथील शेतकरी लक्ष्मी शेषराव मुठाळ यांच्या गट क्रमांक ६९ मधील २.४० एकर शेतीत खरीप हंगामात सोयाबीन पिकाची लागवड करण्यात आली होती. संपूर्ण हंगामभर शेतकर्यांनी कुटुंबासह दिवसरात्र परिश्रम घेऊन पीक तयार केले. नुकतेच कापणीचे काम पूर्ण झाल्याने शुक्रवारी सकाळी सोयाबीनची गंजी करून ती शेतात साठवून ठेवण्यात आली होती.
मात्र दुर्दैवाने अचानक लागलेल्या आगीत ही गंजी काही क्षणांतच जळून खाक झाली. या आगीत दोन्ही सुड्या पूर्णपणे जळाल्या असून, शेतकरी मुठाळ यांचे सुमारे दोन ते अडीच लाख रुपयांचे मोठे नुकसान झाल्याचे सांगण्यात येत आहे. मेहनतीने उभे केलेले पीक क्षणात जळून गेले पाहून शेतकरी कुटुंबावर मोठे संकट कोसळले आहे. शेतकरी लक्ष्मी शेषराव मुठाळ यांनी दुःख व्यक्त करताना सांगितले, संपूर्ण वर्षभर कष्ट करून उभं केलेलं पीक एका क्षणात जळून गेलं. हातात काहीच उरलं नाही. घरखर्च, कर्जफेड, बियाणं, खतं सगळं कसं करायचं, हेच आता समजत नाही. त्यांच्या या शब्दांमधून शेतकर्याच्या मनातील वेदना आणि हतबलता स्पष्टपणे जाणवत होती.
घटनेची माहिती स्थानिक ग्रामस्थांनी महसूल विभागाला तातडीने दिली असून, महसूल अधिकार्यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा करण्याची केला आहे. शेतकर्याला तातडीने नुकसानभरपाई देऊन दिलासा द्यावा, अशी मागणी शेतकर्यांनी तहसीलदार रिसोड यांच्याकडे केली आहे. या घटनेमुळे गोवर्धन परिसरात शोककळा पसरली असून शेतकर्यांच्या दु:खाला सर्वत्र सहानुभूती व्यक्त केली जात आहे. शेती हा जिव्हाळ्याचा व्यवसाय असून, मेहनती शेतकर्याचे सर्वस्व जळून जाणे ही हृदयद्रावक घटना असल्याचे मत स्थानिक शेतकर्यांनी व्यक्त केले आहे.