शंभर वर्षांत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने अनेक कार्यकर्ते घडविले :सुनिलजी जाधव

पथसंचलनाचे पुष्पवृष्टी व रांगोळ्याने स्वागत

    दिनांक :13-Oct-2025
Total Views |
कारंजा लाड,
sunil jadhav राष्ट्रीय स्वयंसेवक संघ कारंजा नगरच्या वतीने संघाच्या शताब्दी वर्षानिमित्त १२ ऑटोबर रोजी स्थानिक श्री स्वामी विवेकानंद संघ स्थान, पोहावेश जवळ श्री विजयादशमी उत्सव मोठ्या उत्साहपूर्वक व शिस्तीत साजरा करण्यात आला. यावेळी प्रमुख वक्ते म्हणून रा.स्व. संघाच्या अकोला विभागाचे सहकार्यवाह सुनिलजी जाधव तर प्रमुख पाहुणे म्हणून येथील हृदय व पोटविकार तज्ञ डॉ.शार्दुल डोणगावकर व्यासपीठावर उपस्थित होते. कार्यक्रमाच्या प्रारंभी शस्त्र पूजन नंतर भारतमाता, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संस्थापक डॉ.केशव हेडगेवार व दुसरे सरसंघचालक तथा विचारवंत माधवराव सदाशिवराव गोलवलकर यांच्या प्रतिमेचे मान्यवरांच्या हस्ते पूजन व हार अर्पण करण्यात आले. त्यानंतर डॉ.शार्दुल डोणगावकर यांनी मनोगत व्यक्त केले. त्यांनी संघटनेचा उद्देश व संघाची विचारसरणी प्रत्येकाने समजून घेणे आवश्यक आहे हे सांगताना संघ कोणकोणत्या समाज व देशहिताच्या कामात अग्रेसर आहे याबद्दल माहिती दिली.
 

 

sunil jadhav
प्रमुख वक्ते तथारा.स्व. संघ अकोला विभागाचे सहकार्यवाह सुनिलजी जाधव यांनी मार्गदर्शन केले. त्यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची निर्मिती ते आजवरचा प्रवास परखडपणे मांडला. भारत हे हिंदुत्व राष्ट्र आहे आणि लवकरच ते हिंदू राष्ट्र म्हणून घोषित करण्यात येईल.राष्ट्रीय स्वयंसेवक संघ हा पंजाबच्या महापुरात त्यांच्या मदतीसाठी सर्वप्रथम धाऊन गेला असे बोलून सिंदूर ऑपरेशनमध्ये भारतीय सैनिकांनी जो साहसी पराक्रम दाखवला याचे खरे सामर्थ्य हे संघाच्या शाखेतूनच येते हे पटवून दिले. १०० वर्षांमध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने अटल बिहारी वाजपेयी, नरेंद्र मोदी, देवेंद्रजी फडणवीस, नितीनजी गडकरी असे अनेक मोठे व्यक्तिमत्व घडविण्याचे काम केले सरतेशेवटी त्यांनी पाच मूलमंत्र अंगीकारण्याचा सल्ला दिला. ज्यामध्ये पर्यावरण ही काळाची गरज आहे निसर्गाचा समतोल बिघडल्यामुळे कुठे भरपूर प्रमाणात पाऊस पडतो तर कुठे काहीच पडत नाही,देश मजबूत करण्यासाठी नागरिकांनी स्वदेशी वस्तूचा वापर करावा आणि वाढीव टॅरीफ लावणार्‍या अमेरिका सारख्या देशांना धडा शिकवावा, सामाजिक समरसता अश्या विषयावर विस्तृत मार्गदर्शन केले.
प्रास्ताविक व आभारप्रदर्शन नगर कार्यवाह केशव दिगांबर साबळे यांनी केले. यावेळी स्वयंसेवक, महिला व पुरुष मोठ्या संख्येने उपस्थित होते. तत्पूर्वी, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कारंजा नगर शाखेतर्फे शहराच्या प्रमुख मार्गावरून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या गणवेशात पथसंचलन करण्यात आले. अनेकांनी रांगोळ्या तथा पुष्पवृष्टी करून या पथसंचलनाचे उत्स्फूर्त स्वागत केले. या पथ संचालनाने शहरातील नागरिकांचे लक्ष वेधले होते.