चंद्रपूर,
tribal community demands अनुसूचित जमातीच्या यादीमध्ये बंजारा, धनगर जमातीचा समावेश करू नये, यासह अन्य विविध मागण्यांना घेऊन आदिवासी समाजाच्या वतीने सोमवार, 13 ऑक्टोबर रोजी येथील कोहीनूर ग्राउंड येथून चंद्रपूर शहरात जंगोम जन आक्रोश महामोर्चा काढण्यात आला. या मोर्चात जिल्हा व जिल्ह्याबाहेरील आदिवासी पुरुष, महिला हजारोंच्या संख्येने सहभागी झाले होते.
या मोर्चात आदिवासी 1950 च्या अनुसूचित जमातीच्या यादीमध्ये बाजारा, धनगर जमातीचा समावेश करू नये, महाराष्ट्र आदिवासी जमीन हस्तांतरण प्रतिबंधक कायदा 1974 या कायद्यावर गदा येत असल्याने त्यामध्ये कोणतेही संशोधन विधेयक प्रस्तावित अथवा कायद्यात बदल करण्यात येवू नये, हैद्राबाद गॅझटमध्ये उल्लेखित जातींना अनुसूचित जमातीचा दर्जा देवू नये, सर्वोच्च न्यायालयाने 7 जुलै 2017 रोजी गैरआदिवासी विरोधात दिलेल्या निर्णयाची अंमलबजावणी महाराष्ट्र शासनाने प्रभावीपणे राबवावी, अनुसूचित 5 व 6 ची अंमलबजावणी करण्यात यावी, अनुसूचित जमातीच्या अधिसंख्य झालेल्या 12 हजार 500 जागा तसेच अनुसूचित जमातीच्या 31 ऑगस्ट 2021 पर्यंत रिक्त असलेल्या सर्व 5 हजार 567 जागा आणि जात पडताळणी समितीकडे प्रलंबित असलेले सेवेचे 15 ते 20 हजार प्रकरणे अशा एकूण 8 हजार 500 रिक्त जागा तात्काळ भरण्यात याव्या, 27 फेब्रुवारी 2024 रोजीच्या शासन निर्णयामध्ये दुरूस्ती करून आदिवासी बिंदू नामावली 2 मध्ये करावी, आदी मागण्यांचा मोर्चात समावेश होता. मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयात पोहचल्यानंतर जिल्हाधिकार्यांना मागणीचे निवेदन देण्यात आले.
त्यानंतर आयोजित सभेत प्रमुख वक्त्यांनी मार्गदर्शन केले. या मोर्चात सामाजिक कार्यकर्ते जितेश कुळमेथे, ट्रायबल डेव्हलपमेंट कल्चरल फाउंंडेशनचे अध्यक्ष घनश्याम मेश्राम, प्रमोद बोरीकर, गोंडराजे विरेंद्रशहा आत्राम, महिपाल मडावी, डॉ. मधुकर कोटनाके, अवचिराव सोयाम, कंटू कोटनाके, धीरज शेडमाके, राधाबाई आत्राम, रवी नैताम, बापुजी मडावी, संतोष कुळमेथे आदींसह ऑल इंडिया आदिवासी एम्प्लॉईज फेडरेशन, अखिल भारतीय विकारा परिषद, गोंडीयन सामाजिक संघटना, ताडोबा जनीय दल, शामादादा कोलाम संघटना, इलबा/हलबी संघटना, राजमात्ता राणी हिराई स्मारक समिती, गोंडवाना गणतंत्र पार्टी, जनसेवा गोंडवाना पार्टी, गोंडराजे खांडक्या बल्लाळशहा स्मारक समिती आदी आदिवासी संघटना सहभागी झाल्या होत्या.