मोठी बातमी...गडचिरोलीत नक्षली नेत्यांसह ६० नक्षलवाद्यांचे आत्मसमर्पण

    दिनांक :14-Oct-2025
Total Views |
गडचिरोली,
60 Naxalites surrender in Gadchiroli नक्षलवाद्यांच्या चळवळीच्या इतिहासात एक ऐतिहासिक आणि धक्कादायक घटना घडली आहे. नक्षलवादी संघटनेतील सर्वोच्च बौद्धिक चेहरा आणि दुसऱ्या क्रमांकाचा महत्त्वाचा नेता मल्लोजुला वेणुगोपाल उर्फ भूपती उर्फ सोनू याने सुरक्षा यंत्रणांसमोर शस्त्रे टाकत आत्मसमर्पण केले आहे. भूपतीसोबत तब्बल ६० नक्षलवाद्यांनी देखील आपली शरणागती जाहीर केली आहे. ही घटना नक्षलवादी चळवळीला मोठा धक्का देणारी असून देशाच्या सुरक्षा यंत्रणेला दिलासा देणारी आहे. भूपतीने रात्री उशिरा गडचिरोली पोलिसांसमोर आत्मसमर्पण केले. १९७० च्या दशकात नक्षलवादी संघटनेत प्रवेश करणाऱ्या भूपतीची कारकीर्द गडचिरोली जिल्ह्यातील सिरोंचा तालुक्यातून सुरू झाली. भूपती हा मल्लोजुला कोटेश्वरराव उर्फ किशनजी याचा धाकटा भाऊ आहे. किशनजी २०११ मध्ये कोलकात्याजवळ झालेल्या चकमकीत ठार झाला होता.भूपतीवर देशभरात ६ कोटींपेक्षा जास्त बक्षीस जाहीर करण्यात आले होते.
 
 
60 Naxalites surrender in Gadchiroli
 
नक्षलवादी संघटनेच्या धोरणात्मक आखणीपासून ते केंद्रीय समितीपर्यंतच्या नियोजनात भूपतीने महत्त्वाची भूमिका बजावली आहे. अनेक हिंसक घटना, संघटनेतील स्थानिक पातळीवरील कारवाया आणि पत्रकांचे प्रकाशनअभय नावाने या सर्वांमध्ये भूपतीचा हात आहे. भूपती हे माओवादी संघटनेच्या इतिहासातील एक मोठा आणि प्रभावशाली चेहरा मानले जातात. गेल्या काही वर्षांत गडचिरोलीतील हे सर्वात मोठे आणि महत्त्वपूर्ण आत्मसमर्पण आहे. आत्मसमर्पण करणाऱ्यांमध्ये जवळपास सर्व प्रमुख नक्षलवादी कॅडरचा समावेश आहे. या घटनेमुळे नक्षलवादी कारवायांना आणि संघटनेच्या मनुष्यबळाला प्रचंड धक्का बसला आहे. भूपतीने काही दिवसांपूर्वीच केंद्र सरकारकडे शांती वार्तेसाठी पत्र पाठवले होते, ज्यात तात्पुरत्या शस्त्रसंधीची मागणी होती. माओवादी नेतृत्वाने या वक्तव्यात तीव्र प्रतिक्रिया दिल्यानंतर संघटनेत फूट निर्माण झाली होती. गडचिरोली पोलिसांचे दीर्घकालीन प्रयत्न अखेर यशस्वी ठरले, आणि भूपतीसह ६१ नक्षलवाद्यांनी शरणागती जाहीर केली.
 
 
 
सुशिक्षित आहे भूपती
भूपती यांचे वय ६९ वर्षे असून तो बीकॉम पदवीधर आहे. महाराष्ट्र आणि छत्तीसगडच्या सीमावर्ती माड डिव्हिजनमध्ये तो सक्रिय होता. त्याची पत्नी तारक्का हिने मागील वर्षीच गडचिरोली पोलिसांकडे आत्मसमर्पण केले असून सध्या ती पोलीस पुनर्वसन शिबिरात आहे. माजी महासचिव बसवराजू याच्या मृत्यूनंतर भूपतीला पक्षाच्या सर्वोच्च पदाचा संभाव्य दावेदार मानले जात होते. ही घटना नक्षलवाद्यांच्या आंदोलनासाठी एक निर्णायक टप्पा मानली जात आहे. भूपती आणि ६० अन्य नक्षलवाद्यांचे आत्मसमर्पण माओवादी चळवळीच्या रणनीतीस आणि मनुष्यबळाला गंभीर धक्का देणारे ठरले आहे. सुरक्षा यंत्रणांसाठी ही मोठी यशस्वी घटना असून, नक्षलवाद्यांवरील लक्ष केंद्रित करत येणाऱ्या आगामी काळातील कारवाईसाठी मार्ग मोकळा केला आहे.