वर्धा,
ATM theft case : समुद्रपूर येथील एटीएम चोरी प्रकरणात पोलिसांकडून चोरट्यांच्या टोळीचा शोध घेतला जात आहे. तपासादरम्यान नागपूर जिल्ह्यातील कोराडी परिसरात पोलिसांना मालवाहू वाहन सापडले. याच वाहनाचा एटीएम चोरीच्या गुन्ह्यात वापर झाल्याने ते जप्त करून समुद्रपूर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. चोरट्यांची टोळी राज्याबाहेरील असल्याचा अंदाज पोलिसांचा असून आरोपींच्या शोधार्थ पोलिसांच्या चार चमू रवाना करण्यात आल्या आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, ५ ऑटोबर रोजी पहाटे समुद्रपूर येथील बँक ऑफ इंडिया शाखेचे लाखो रुपयांची रोकड असलेले एटीएम चोरून नेले. पोलिसांच्या तपासात हे मशीन मालवाहू वाहनाच्या सहाय्याने नेण्यात आल्याचे निष्पन्न झाले आहे. चोरट्यांचा माग काढण्यासाठी एलसीबीच्या दोन व समुद्रपूर पोलिसांच्या दोन अशा चार चमू रवाना करण्यात आल्या होत्या. या चमूंनी हायवेवरील टोल नाके व ढाब्यांवरील सीसीटीव्हीचे चित्रिकरण तपासले. संबंधित वाहन बुटीबोरीमार्गे नागपूरच्या दिशेने गेल्याचा सुगावा लागल्यावर पोलिसांनीही आपल्या हालचालींना गती दिली. त्यानंतर कोराडी जंगल परिसरात पोलिसांना गुन्ह्यात वापरण्यात आलेले एम. एच. ४९ डी. ०७११ क्रमांकाचा मालवाहू वाहन बेवारस स्थितीत गवसला. पोलिसांनी अधिकची चौकशी केल्यावर हे वाहन नागपूरमधील इमामवाडा परिसरातील देवकुमार काळसर्पे यांच्या नावावर असल्याचे पुढे आले. शिवाय ते वाहन ३ रोजी चोरीला गेल्याची माहितीही पोलिसांना मिळाली. चोरट्यांच्या टोळीने नागपूर येथून वाहन चोरून चंद्रपूर मार्गे समुद्रपूर गाठून एटीएम चोरी करून नागपूरच्या दिशेने पलायन करीत वाहन कोराडी परिसरात सोडून दिल्याचे पोलिसांच्या आतापर्यंतच्या तपासात पुढे आले आहे.