सततच्या पावसाने आयुष्याची घडीच विस्कटली

*पॅकेजची रकम तुटपुंजी, कर्जाचा बोझा कायम?

    दिनांक :14-Oct-2025
Total Views |
घोराड,
heavy rain सततच्या नापिकीमुळे मेटाकुटीस आलेला शेतकरी यावर्षीच्या खरीप हंगामात अतिवृष्टीने हतबल झाला आहे. जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे हाता-तोंडाशी आलेला घास हिरावून गेला. पुरामुळे पिकांसह शेतजमिनी खरडून निघाल्या. ऐन दिवाळी सण तोंडावर असताना उत्पन्न सोडा खर्चही निघाला नाही. त्यामुळे आयुष्याची आर्थिक घडीच विस्कटली आहे. या परिस्थितीतून सावरणार कसा, हा संशोधनाचा विषय ठरला आहे. सरकारने पॅकेजची घोषणा केली असली तरी तुटपुंज्या मदतीमुळे कर्जाचा बोझा कायम आहे.
 

शेतकरी  
 
 
माय बाप सरकार असा उल्लेख केला जातो. सरकारकडूनच भरीव मदतीची आशा फोल ठरली तर शेतकर्‍यांनी न्याय मागावा कुणाला, असा प्रश्न बळीराजापुढे उपस्थित झाला आहे. पाऊस थांबला, सोयाबीन काढण्यास सुरूवात झाली असली तरी एकरी उत्पादन २ विंटल येत असल्याने शेतकर्‍यांच्या डोळ्यात अश्रु दिसून येत आहे. काही शेतकरी सोयाबीन गंजीला आग लावताना दिसत आहे तर काहींनी सोयाबीनमध्ये जनावरं सोडल्याचे पहायला मिळत आहे. दिवाळी सण समोर आला असताना मुलांचे शिक्षण, घर खर्च, दिवाळीची खरेदी थांबली आहे. सर्व सोंग करता येते पण पैशाचे नाही, असे म्हणतात. मात्र, अतिवृष्टीने सर्वच हिरावून घेतलेल्या शेतकर्‍यांनी करायचे काय? खरिपातील पिकापासून उत्पन्न मिळाले नाही.heavy rain पाच एकरात लाख रुपये खर्च झाला असून खर्चही निघाला नाही. पुढे रबी हंगाम आला पण, पैसे आणायचे कुठून. शासनाकडून मदत मिळेल पण तुटपुंज्या मदतीने आर्थिक घडी सावरणार कशी, असा सवालही शेतकर्‍यांनी उपस्थित केला आहे.
एक महिना पाऊस लांबल्याने तसेच मुसळधार बरसल्याने कपाशीसह तुरीचेही नुकसान झाले. कृषी केंद्राची उधारी, किराणा, कापडांची उधारी चुकता कशी करायची? महिन्याला सिलेंडर व विजेची देयके कशी भरायची, असा प्रश्न शेतकर्‍यांपुढे उभा ठाकला आहे. पावसाने तोंडचा घास हिरावल्याने ऐन दिवाळीत ग्रामीण भागातील बाजारपेठांमध्ये आर्थिक मंदिचे सावट दिसून येत आहे.