वर्धा,
Cybercriminals' funds दिवसागणिक सायबर गुन्ह्यांचे प्रमाण वाढतच चालले आहे. दररोज अनेक नागरिक सायबर गुन्हेगारांच्या जाळ्यात अडकतात. हे गुन्हेगार नवनवीन फंडे वापरून नागरिकांना ऑनलाईन फसवत आहे. वर्धा येथील सायबर पोलिस ठाण्यात २०२४ आणि २०२५ या दोन वर्षांत २१ महिन्यांमध्ये तब्बल ९२ सायबर गुन्ह्यांची नोंद झाली आहे. या गुन्ह्यांमध्ये नागरिकांची कोट्यवधी रुपयांची फसवणूक झाली आहे.
सायबर पोलिसांनी सन २०२४ मध्ये १९ प्रकरणांचा छडा लावून ८ लाख ७५ हजार ५०० रुपयांची रकम जप्त केली तर २०२५ मध्ये आतापर्यंत ३ गुन्ह्यांचा छडा लावून पोलिसांना दीड लाख रुपयांची रकम वाचवण्यात यश मिळाले. सायबर गुन्हेगार एपीके फाइल्स, सेसटॉर्शन, पार्सल फ्रॉड, क्रेडिट कार्ड व एटीएम अपडेट, सोलर पॅनल, शेतकरी योजना, वीज बिल भरणा आदी प्रकारांद्वारे नागरिकांना फसवत आहेत. सायबर पोलिसांनी नागरिकांना अशा फसवणुकींपासून सावध राहण्याचे आवाहन केले आहे.
३.९० कोटींची फसवणूक
जिल्ह्यात २०२४ मध्ये ६७ सायबर गुन्ह्यांची नोंद झाली असून सायबर गुन्हेगारांनी २ कोटी ३३ लाख ९० हजार ६५४ रुपयांची फसवणूक केली आहे. तर २०२५ मध्ये आतापर्यंत २५ प्रकरणे उघडकीस आली असून यात १ कोटी ५७ लाख ४८ हजार ११ रुपयांची फसवणूक झाली आहे. गेल्या २१ महिन्यांत सायबर गुन्हेगारांनी ३.९० कोटींपेक्षा जास्त रकम लुबाडल्याची नोंद आहे. त्यापैकी २०२४ मध्ये ८.७८ लाख व २०२५ मध्ये दीड लाख रुपये सायबर पोलिसांनी वाचवले आहेत. काही प्रकरणांमध्ये इतर राज्यांमधूनही आरोपींना अटक करण्यात आली आहे.