सिंदी (रेल्वे),
Demand of cardholders including Sarpanch नजिकच्या तुळजापूर येथे नव्याने दिलेला स्वस्त धान्य वितरणाचा परवाना रद्द करा, अशी मागणी सरपंच आणि गावकर्यांनी सेलू तहसील धान्य पुरवठा अधिकार्याकडे केली आहे. तुळजापूर येथे सप्टेंबर महिन्यापर्यंत भट यांना रेशनचे धान्य वितरित करण्याची परवानगी देण्यात आली होती. परंतु, गावकर्यांची कोणतीही तक्रार नसताना तालुका पुरवठा अधिकारी यांनी ऑटोबर महिन्याचे रेशन वितरणाचा परवाना बबिता अरविंद पाटील यांना दिला आहे. या महिलेचे यजमानच संपूर्ण व्यवहार सांभाळतात. मात्र, ग्राहकांशी त्यांचे वर्तन उद्धट आणि मुजोरीचे असल्याची तक्रारीत सरपंच यांनी नमूद केले आहे. लोकभावनेचा आदर करून बबिता पाटील यांचा परवाना त्वरित रद्द करावा, अन्यथा शिधा पत्रिकाधारक आंदोलन उभारतील, असा इशारा निवेदनातून देण्यात आला आहे.
धान्य पुरवठा विभागातर्फे सदर परवाना देताना त्या आदेशाची प्रत, जाहिरनामा रुपाने जनतेच्या अवलोकनार्थ आणि आक्षेप अथवा हरकती घेण्यासाठी सार्वजनिक स्थळी लावली नव्हती. नियमानुसार तलाठी व ग्रापंच्या कार्यालयात तो जाहिरनामा दर्शनीय भागी १५ दिवस लावणे अनिवार्य असते. जनतेची हरकत नसल्यास ग्रामपंचायत कार्यालय तशी सूचना संबंधित अधिकार्याकडे लेखी स्वरुपात पाठवतो. मात्र, या प्रकरणात तसे सोपस्कार पार पडले नाही. त्यामुळे प्रशासनाने या गुपचूप झालेल्या व्यवहाराची चौकशी करावी व दोषींवर कारवाई करावी, अशी मागणी आहे.