जनरेशन Z चं बंड! मादागास्करचे राष्ट्राध्यक्ष देश सोडून पळाले

    दिनांक :14-Oct-2025
Total Views |
अंतानानारिवो,
madagascars gen z नेपाळनंतर आता आफ्रिकन देश मादागास्करमध्येही जनरल Z च्या बंडानं राजकीय भूकंप घडवला आहे. पाणी आणि वीज टंचाईमुळे उफाळलेल्या जनतेच्या रोषाने आंदोलनाच्या स्वरूपात भीषण रूप धारण केले असून, अखेर देशाचे राष्ट्राध्यक्ष आंद्रे राजोएलिना यांनी देश सोडून पळ काढल्याची माहिती समोर आली आहे. विरोधी पक्षनेते, लष्करी अधिकारी आणि परदेशी राजनयिकांनी या घटनेची पुष्टी केली आहे. सुमारे दोन आठवड्यांपासून सुरू असलेल्या आंदोलनांनी सोमवारी हिंसक वळण घेतले. राजधानी अंतानानारिवोमध्ये हजारो तरुण रस्त्यावर उतरले आणि राष्ट्राध्यक्षांच्या राजीनाम्याची मागणी केली. लष्कराच्या काही गटांनीही निदर्शकांना पाठिंबा दिला, ज्यामुळे सरकारची स्थिती आणखीच डळमळली.
 

GEN z
 
 
दरम्यान, राष्ट्राध्यक्ष राजोएलिना यांनी सोमवारी रात्री फेसबुकवरून जनतेला संबोधित करत सांगितले की, ते “पत्नीचा जीव वाचवण्यासाठी” सुरक्षित ठिकाणी गेले आहेत. मात्र, ते नेमके कुठे आहेत याबद्दल त्यांनी काहीही सांगितले नाही. त्यांनी एवढंच म्हटलं, “मी मादागास्कर नष्ट होऊ देणार नाही.”
राजोएलिना हे फ्रेंच लष्करी विमानाने देशाबाहेर गेले असल्याची माहिती समोर आली आहे. मादागास्कर हा पूर्वी फ्रेंच वसाहत होता, त्यामुळे या बातमीला अधिक महत्त्व प्राप्त झाले आहे. तथापि, फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांनी या घटनेबाबत “अद्याप कोणतीही अधिकृत माहिती नाही” असे सांगितले आहे.
२५ सप्टेंबरपासून सुरू झालेल्या या आंदोलनाचं मूळ कारण म्हणजे गंभीर पाणी आणि वीज टंचाई. तरुणांनी सरकारविरुद्ध “जीवनाच्या मूलभूत गरजांवर अन्याय” झाल्याचा आरोप करत देशव्यापी निदर्शने सुरू केली होती. नेपाळ आणि केनियामधील जनरल Z चळवळीच्या यशस्वी मोहिमेनंतर या चळवळीने मादागास्करमध्येही सत्ताबदल घडवून आणल्याचा दावा केला आहे. दरम्यान, लष्कराने राजधानीतील प्रमुख सरकारी इमारतींवर ताबा घेतला असून, तात्पुरते प्रशासन स्थापन करण्याची प्रक्रिया सुरू असल्याचे वृत्त आहे. विरोधी पक्ष नेत्यांनी सांगितले की, “जनरल Z ने फक्त सरकार उलथवले नाही, तर नवीन आशेची लाट निर्माण केली आहे.” या घटनेमुळे मादागास्कर तसेच संपूर्ण आफ्रिकन खंडात तरुणांच्या चळवळीचा प्रभाव झपाट्याने वाढताना दिसत आहे, आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर या बंडाकडे आता तीव्र लक्ष लागले आहे.