अल्लीपूर,
March for Water : येथील नागरिकांना भर पावसाळ्यात तीन दिवसाआड पिण्याचे पाणी मिळत असल्याने संतप्त महिलांनी ग्रापंवर मोर्चा काढून आपला राग व्यत केला. येत्या दोन दिवसात नियमित पाणीपुरवठा करा, अशी ताकीदच ग्रापं प्रशासनाला संतप्त मोर्चेकरांनी दिली.

अल्लीपूर येथील ग्रामपंचायत आवारात २ लाख क्षमतेचा जलकुंभ जिर्ण झाल्याने त्या भागात एक लाख क्षमतेची नवी टाकी बांधण्यात आली. पण, जलवाहिनी सदोष असल्याने व क्षमतेपेक्षा कमी पाणी पुरवठा होत असल्यामुळे नागरिकांना तीन दिवसाआड पाणी पुरवठा होत आहे. याबाबतच्या अनेक तक्रारी प्राप्त झाल्या. पाईप जोडणीची कामे चुकीच्या पद्धतीने झाल्याने पुन्हा जलवाहिनीचे काम सुरू आहे. त्यामुळे नागरिकांना पाणी पुरवठा नियमित होत नाही. दरम्यान, ग्रापंच्या या तकलादू कामाविरुद्ध भवानी वार्डातील संतप्त महिलांनी ग्रापंवर मोर्चा काढून आपला संताप व्यत केला. येत्या दोन दिवसात कामे पूर्ण करून नियमितपणे पाणी पुरवठा सुरू करण्याची ताकीदच संतप्त महिलांनी दिली. महिलांच्या समस्या ग्रामविकास अधिकारी दत्तात्रय दिवटे यांनी ऐकूण घेत दोन दिवसात गावात नियमित स्वच्छ पाणी पुरवठा होईल, असे आश्वासन आंदोलक महिलांना दिले.
यावेळी ग्रापंच्या माजी सदस्य सुनीता लिचडे, लता लिचडे, सोनू किनगावकर, तारा किनगावकर, संगीता पाकमोडे, रेखा सुरकार, नैना लांडे, भारती वाघमारे, वंदना किनगावकर, सत्यभामा लिचडे, कामिनी लिचडे, भारती तिमांडे आदी महिला उपस्थित होत्या.