सुशांतचे भाऊजी ओपी सिंग बनले हरियाणाचे नवे डीजीपी!

    दिनांक :14-Oct-2025
Total Views |
चंदीगड,
OP Singh : आयपीएस अधिकारी वाई पुरण सिंग यांच्या आत्महत्येप्रकरणी हरियाणाचे डीजीपी शत्रुजीत कपूर यांना रजेवर पाठवण्यात आले आहे. त्यांच्या जागी एडीजीपी पदावरील वरिष्ठ आयपीएस अधिकारी ओपी सिंग यांची कार्यवाहक पोलिस महासंचालक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. सिंग हे दिवंगत अभिनेता सुशांत सिंग राजपूत यांचे भाऊजी आहेत. त्यांनी हरियाणा पोलिस गृहनिर्माण महामंडळ आणि एफएसएल मधुबनचे संचालक म्हणून काम पाहिले.
 
 
 
op singh
 
 
पोलिसांनी या प्रकरणात डीजीपी आणि सुसाईड नोटमध्ये नाव असलेल्या सर्व अधिकाऱ्यांविरुद्ध एफआयआर दाखल केला आहे. २००१ च्या बॅचचे आयपीएस अधिकारी वाई पुरण कुमार हे रोहतक येथील पोलिस प्रशिक्षण केंद्रात महानिरीक्षक (आयजी) म्हणून तैनात होते. त्यांनी ७ ऑक्टोबर रोजी आत्महत्या केल्याचा आरोप आहे. त्यांच्या आठ पानांच्या सुसाईड नोटमध्ये १३ वरिष्ठ अधिकाऱ्यांची नावे होती, ज्यात छळ आणि करिअरला धोका निर्माण झाल्याचे आरोप होते. यापैकी, डीजीपी शत्रुजीत कपूर आणि रोहतक पोलिस अधीक्षकांवर सर्वात गंभीर आरोप लावण्यात आले होते.
 
या प्रकरणासंदर्भात शनिवारी रोहतकचे माजी पोलिस अधीक्षक (एसपी) नरेंद्र बिजार्निया यांना त्यांच्या पदावरून काढून टाकण्यात आले आणि सुरिंदर सिंग भोरिया यांची रोहतकचे नवीन पोलिस अधीक्षक (एसपी) म्हणून नियुक्ती करण्यात आली. बिजार्निया यांना अद्याप नवीन पद देण्यात आलेले नाही. तपास पूर्ण होईपर्यंत डीजीपी शत्रुघ्न कपूर यांना रजेवर पाठवण्यात आले आहे. याशिवाय, चंदीगड पोलिसांनी वाई पूरण कुमार यांच्या पत्नीचा लॅपटॉप तपासासाठी मागितला आहे.