गडचिरोली,
Sai Baba's in Gadchiroli श्री साईबाबा संस्थान, शिर्डी येथून साईबाबांच्या ‘मुळ चर्मपादुका’चे दुसर्यांदा गडचिरोलीत आगमन झाल्याने संपूर्ण शहर भक्तिभावाने दुमदुमले. या पवित्र आगमनानिमित्त विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. आयोजन समितीने यासाठी जय्यत तयारी केली होती. सर्वप्रथम चंद्रपूर मार्गावरील कारगील चौकात श्री साई पादुका रथाचे भव्य स्वागत करण्यात आले. त्यानंतर रथयात्रेला आठवडी बाजारातील हनुमान मंदिर ते सराफा लाईन, मुख्य मार्केटमधील साई मंदिर लाईन, त्रिमूर्ती चौक, दुर्गा माता मंदिर, इंदिरा गांधी चौक ते चामोर्शी मार्गावरील साई मंदिर असा मार्ग होता. या रथयात्रेत कलशधारी महिला, ढोल-ताशे पथक व विविध आकर्षक दृश्यांनी भाविकांचे लक्ष वेधले. साईबाबांच्या प्रतिकात्मक साकारलेल्या दृश्याने भाविकांना शिर्डीतील वातावरणाचा अनुभव गडचिरोलीतच मिळाला.

सकाळी 11 वाजता चामोर्शी मार्गावरील साई मंदिरात श्री साई पादुका अभिषेक व दर्शन सोहळा संपन्न झाला. दुपारी 12 वाजता मध्याह्न आरती व नैवेद्य करण्यात आले. त्यानंतर दुपारी 2 वाजेपर्यंत भजन संध्या, दुपारी 3 ते सायं 6 या वेळेत श्री साई पालखी भजन सोहळा आयोजित करण्यात आला. या सोहळ्याचा मुख्य सांस्कृतिक आकर्षण ठरला तो एक शाम साई के नाम हा भव्य संगीत कार्यक्रम. अभिनव लॉन येथे आयोजित या कार्यक्रमात ‘झी मराठी सा रे ग म प’ चे महाविजेते गायक कार्तिक गायकवाड आणि ‘कलर्स मराठी गौरव महाराष्ट्राचा’ चे महाविजेते गायक कौस्तूभ गायकवाड यांनी आपल्या सुरेल आवाजात साई भक्तीगीतांची सादरीकरणे केली.
संपूर्ण दिवस साई मंदिर परिसरात भक्तीमय वातावरण अनुभवायला मिळाले. रात्रो 10 वाजेपर्यंत भाविकांसाठी महाप्रसादाची व्यवस्था करण्यात आली होती, ज्याचा हजारो भाविकांनी लाभ घेतला. मंदिर परिसर तोरण, पताका आणि फुलांच्या माळांनी सजविण्यात आला होता. साईबाबांच्या पादुका मंदिरात विराजमान झाल्यानंतर परिसराला उत्सवाचे स्वरूप प्राप्त झाले. या रथयात्रेत विरोधी पक्षनेते तथा आमदार विजय वडेट्टीवार सहभागी झाले होते. त्यांनी साईबाबांच्या चर्मपादुकांचे स्वागत करून मंदिरात उत्कृष्ट कार्य करणार्या साई भक्तांचा शाल-श्रीफळ देऊन सत्कार केला. तसेच साई पादुकांचे दर्शन घेण्यासाठी आमदार डॉ. मिलिंद नरोटे, माजी खासदार अशोक नेते, माजी आमदार डॉ. देवराव होळी यांच्यासह शहरातील मोठ्या संख्येने भाविक उपस्थित होते.
या भव्य उत्सवाच्या यशस्वी आयोजनासाठी येथील साई मंदिर समितीच्या कार्यकर्त्यांनी अथक परिश्रम घेतले. दिवसभर चालणार्या धार्मिक कार्यक्रमांमुळे गडचिरोली शहर साई नामाच्या गजराने दुमदुमले आणि साईभक्तांना अविस्मरणीय आध्यात्मिक अनुभव मिळाला.